Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला दिला जाईल; कोणावरही अन्याय होणार नाही

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर


आराखड्याच्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन




कोल्हापूर :  श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनातील बाधित नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन देऊन मंदिर परिसर विकास आराखडा राबवताना करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. 


करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान मंदिर व परिसर विकास आराखडा राबवत असताना प्रस्तावित भूसंपादनाशी निगडीत नागरिक, व्यापारी, नगरसेवक, श्रीपूजक यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.


 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव तसेच संबंधित मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


श्री. क्षीरसागर म्हणाले, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे आई अंबाबाईचे मंदिर हे प्राचीन काळातील मंदिर आहे. अंबाबाई मंदिराचा विकास करताना भाविक आणि परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, अशी शासनाची सकारात्मक भूमिका आहे. आराखड्यासाठी भूसंपादन करताना कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मंदिर परिसरातील बाधित नागरिकांना जागेसाठी योग्य मोबदला देण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 


श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा राबवताना करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री क्षीरसागर व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थित नागरिकांना केले.



जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. मंदिर परिसराचा विकास आराखडा राबवताना भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विकास आराखड्यामध्ये 360 मिळकतींचे भूसंपादन करणे आवश्यक असून यातील 89 मिळकती निवासी, 195 वाणिज्य, तर 53 मिळकती संयुक्त आहेत. मिळकत पत्रिकेवरील जमिनीचे क्षेत्र 28 हजार 58 चौरस मीटर असून खाजगी मालकी असणाऱ्या 19 हजार 489 चौरस मीटर क्षेत्राबाबत भूसंपादन प्रक्रिया राबवण्याबाबत विचार झाला आहे. तसेच या आराखड्या अंतर्गत दर्शन रांग, दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग, वाणिज्य संकुलांचा विचार करुन दुकान गाळे, अन्नछत्र, मंदिर कार्यालय, ॲम्पीथिएटर, स्वच्छतागृह, हेरिटेज प्लाझा, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड व अन्य आवश्यक सुविधांचा विचार या विकास आराखड्यामध्ये करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिली.



मंदिर परिसरातील बाधित होणाऱ्या सदनिका व गाळे मालकांनी आराखड्याबाबत काही सूचना करून हा आराखडा राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.