Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्नेहाचा धागा, विश्वासाची साथ!; गडहिंग्लज ज्युनिअर कॉलेजच्या 'एनएसएस' कडून दिव्यांगांसोबत रक्षाबंधन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): ‘रक्षाबंधन’ म्हणजे केवळ भावा-बहिणीच्या नात्याला उजाळा देणारा सण नव्हे, तर समाजात माणुसकी, प्रेम आणि आपुलकीची पेरणी करणारा एक रेशमी उत्सव. याच सामाजिक जाणिवेतून गडहिंग्लज ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘चैतन्य अपंगमती विकास विद्यालया’तील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत अतिशय हृदयस्पर्शी वातावरणात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.


कार्यक्रमादरम्यान एनएसएस स्वयंसेवकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. स्वयंसेविकांनी स्वतः तयार केलेल्या राख्या या विद्यार्थ्यांच्या मनगटावर बांधून केवळ धागाच गुंफला नाही, तर आयुष्यभर आपुलकी आणि विश्वासाने पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. भेटवस्तूंपेक्षाही मिळालेला वेळ आणि स्नेहामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अधिक बोलका होता. "आम्हाला कोणाची दया नको, तर समाजाची साथ आणि विश्वासाची गरज आहे" हा अत्यंत मोलाचा व संवेदनशील संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.


हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य पी. टी. पाटील आणि पर्यवेक्षक प्रा. सी. व्ही. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. एनएसएस विभागप्रमुख प्रा. संगीता पाटील, प्रा. अनिता पाटील, प्रा. तृप्ती गवाणकर आणि एनएसएसच्या विद्यार्थिनींनी या अनोख्या नात्याची विण अधिक घट्ट केली.


​या वेळी चैतन्य अपंगमती विद्यालयाचे प्राचार्य साताप्पा कांबळे, अरुणा कांबळे, रूपाली कोगनोळे, सुवर्णा कांबळे, निरंजन स्वामी, शीला गिलबिले, सोनाली शिपुरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनएसएसच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.