Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गरिबीवर मात करत औरनाळच्या सुप्रियाची गगनभरारी; एकाच वेळी दोन शासकीय पदांना घातली गवसणी!

शेतमजूर दाम्पत्याच्या कन्येचे स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश

 

नाशिक मनपा कनिष्ठ अभियंता आणि 'एमजेपी'त सहाय्यकपदी निवड


                            कु. सुप्रिया वीरभद्र खानापुरे

गडहिंग्लज (संपत सावंत) : परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द आणि अपार कष्टाची तयारी असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते, हे गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळच्या कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, शेतकरी कुटुंबाची आर्थिक विवंचना आणि मर्यादित साधनसुविधांचा सामना करत कु. सुप्रिया वीरभद्र खानापुरे हिने स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. तिची एकाच वेळी नाशिक महानगरपालिकेत 'कनिष्ठ अभियंता' आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात (MJP) 'स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक' या दोन महत्त्वाच्या शासकीय पदांवर निवड झाली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात अभिमानाची लाट पसरली आहे.


तुटपुंजी शेती नि मोलमजुरी; पण शिक्षणाची धग कायम


सुप्रियाचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. आई सौ. सुरेखा व वडील वीरभद्र खानापुरे हे तुटपुंज्या जमिनीवर शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत असत. रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. आई-वडिलांच्या हाताला पडलेले फोड आणि घामाच्या प्रत्येक थेंबाचे चीज करण्याचे स्वप्न सुप्रियाने उराशी बाळगले होते.



औरनाळ ते अभियांत्रिकी पदवी : असा राहिला शैक्षणिक प्रवास


सुप्रियाचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर औरनाळ येथे झाले. त्यानंतर जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथून सेमी-इंग्रजी माध्यमातून तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एम.आर. ज्युनियर कॉलेजमधून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, महागाव येथून तिने 'सिव्हिल इंजिनिअरिंग'ची पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतला.


ग्रामीण तरुणाईसाठी आशेचा किरण


कोणताही भपका नाही, खाजगी शिकवणीचा मोठा आधार नाही. केवळ पुस्तकांशी जोडलेली निष्ठा आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर सुप्रियाने हे दुहेरी यश मिळवले आहे. तिचे हे यश केवळ दोन शासकीय पदांवरील निवड नसून ग्रामीण भागातील विशेषतः प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वासाचा एक मोठा किरण ठरला आहे. सुप्रियाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल औरनाळ गावासह संपूर्ण गडहिंग्लज परिसरातून तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.



परिस्थिती नाही, तर कर्तृत्व भविष्य घडवते!


"माझ्या आई-वडिलांनी शेतात राबून, मोलमजुरी करून मला शिकवले. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून मी अभ्यासात सातत्य ठेवले. गाव कितीही लहान असो किंवा परिस्थिती कितीही बिकट असो, जिद्द सोडली नाही तर यश नक्की मिळते, असा संदेश देत सुप्रियाने हे यश आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला समर्पित केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.