Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तिलारी नदीपात्रात दोघेजण वाहून गेले; एका आठ वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृतदेह सापडला

घोटगेवाडी कॉजवेवरील दुर्घटना; सह्याद्री रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर बालकाचा शोध, २५ वर्षीय तरुणाचा शोध अद्याप सुरूच




आजरा (हसन तकीलदार):  आजरा तालुक्यातील घोटगेवाडी येथील तिलारी नदीच्या कॉजवेवर काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रस्ता पार करण्याच्या घाईत एक २५ वर्षीय परप्रांतीय तरुण आणि अवघा ८ वर्षांचा शाळकरी मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने संपूर्ण परिसराला सुन्न केले आहे. दरम्यान, देवदूत बनून धावलेल्या 'सह्याद्री ऍडव्हेन्चर अँड रेस्क्यू टीम'ला दुर्दैवाने यातील ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे, तर दुसऱ्या तरुणाचा शोध अद्याप सुरुच आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, घोटगेवाडी येथील तिलारी नदीवरील कॉजवेवरून अनुरंजन किसकोटा (वय २५, रा. छत्तीसगड) आणि रेगन दिलीप बडे (वय ८) हे दोघे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असल्याने क्षणात दोघेही पाण्याच्या वेगात दिसेनासे झाले. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, ते थरारक दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येत आहे. घटनेची माहिती मिळताच कोनाळचे उपसरपंच रत्नकांत करें यांनी तातडीने प्रशासनाला संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. प्रशासनानेही वेगाने हालचाली करत तिलारी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी केला.



रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न


स्थानिक ग्रामस्थांच्या आक्रमक मागणीनंतर आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 'सह्याद्री ऍडव्हेन्चर अँड रेस्क्यू टीम'ला तातडीने पाचारण करण्यात आले. प्रतिकूल हवामान, पाऊस आणि नदीचे तुडुंब भरलेले पात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीत रेस्क्यू टीमने बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. तासन्‌तासांच्या अथक परिश्रमानंतर ८ वर्षांच्या रेगन बडे या बालकाचा मृतदेह शोधण्यात टीमला यश आले. निष्पाप बालकाचा मृतदेह हाती लागताच संपूर्ण घोटगेवाडी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



प्रतिकूल परिस्थितीत धावून येणारे 'सच्चे देवदूत'


ऊन, वारा, मुसळधार पाऊस किंवा कितीही धोकादायक दरी असो,  आंबोली व आसपासच्या परिसरात कोणतीही आपत्ती आल्यास 'सह्याद्री ऍडव्हेन्चर अँड रेस्क्यू टीम' अत्यंत तत्परतेने घटनास्थळी पोहोचते. याही मोहिमेत जीवाची पर्वा न करता टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला.


या शोधमोहिमेत बाबल अल्मेडा, मायकल डिसोझा, उत्तम नार्वेकर, संतान अल्मेडा, लोरन्स अल्मेडा, राकेश अमृस्कर, अजित नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरु सावंत, दाजी माळकर, सर्वेश नाईक यांनी प्रत्यक्ष पात्रात उतरून मोहीम राबवली. तर स्वप्नील निंबाळकर आणि दत्ताराम देसाई यांनी बचाव बोटीची वेळेवर सोय करून मोहीम यशस्वी करण्यास मदत केली, अशी माहिती टीमचे सदस्य सुजित चुलीयन यांनी दिली.


सध्या २५ वर्षीय तरुण अनुरंजन किसकोटा याचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात व्यापक शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.