Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तब्बल ३० वर्षांनंतर गडहिंग्लजमध्ये जागली ‘श्रीयाळ षष्ठी’ची लोकपरंपरा!

नदीवेस शेकोटी मंडळाचा स्तुत्य उपक्रम

तोंडातून अन् पाठीतून धूर सोडणारी २० फुटी अनोखी मूर्ती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू




गडहिंग्लज (अमर डोमणे ): लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृतीला उजाळा देत, गडहिंग्लज येथील 'नदीवेस शेकोटी मंडळा'ने तब्बल तीन दशकांनंतर (३० वर्षांनी) पारंपरिक 'श्रीयाळ षष्ठी'चा उत्सव मोठ्या उत्साहात पुनरुज्जीवित केला आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणाऱ्या या परंपरेनिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर परिश्रम घेऊन श्रीयाळ राजाची सुमारे  २० फूट उंच भव्य आणि कलात्मक मूर्ती साकारली. पाठीतून आणि तोंडातून धूर काढणाऱ्या या अनोख्या मूर्तीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.


संस्कृती व परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नदीवेस शेकोटी मंडळाच्या ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही मोहीम हाती घेतली. चिखल, मातीचा डेरा व इतर पारंपरिक साहित्याचा वापर करून ही मूर्ती घडवण्यात आली. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेले काम पहाटे ४ वाजेपर्यंत अविरत सुरू होते.


मूर्तीचे वैशिष्ट्य आणि आधुनिक कलात्मकता


मूर्ती आतून पोकळ ठेवली असून, तिच्या पाठीतून आणि तोंडातून धूर बाहेर पडण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. श्रीयाळ राजाच्या हातात पारंपरिक चिलीम दाखवण्यात आली आहे. पारंपरिक कल्पनेला आधुनिक कलात्मकतेची जोड देऊन उभारलेली ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी नदीवेस परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


तब्बल ३० वर्षांनंतर परंपरेला पुनरुज्जीवन


पूर्वी गडहिंग्लज शहरात श्रीयाळ षष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. मात्र, काळाच्या ओघात ही प्रथा बंद पडली होती. ३० वर्षांनंतर नदीवेस शेकोटी मंडळाने ही लोकपरंपरा पुन्हा सुरू करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


काय आहे श्रीयाळ षष्ठी आणि 'औट घटकेच्या राजा'ची कथा?


पौराणिक कथेनुसार श्रीयाळ शेठ हे भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या अतिथीसेवेची परीक्षा घेण्यासाठी महादेवाने साधुरूपात येऊन त्यांची परीक्षा घेतली. धर्मसंकटातही श्रीयाळ शेठ व चांगुणा राणीने अतिथीधर्माचे पालन केले. या असीम त्यागाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. अशी आख्यायिका सांगितली जाते.


औट घटकेचा राजा


'औट घटकेचा राजा' या परंपरेनुसार दुष्काळ किंवा संकटकाळात श्रीयाळ राजाचे प्रतीकात्मक राज्य असायचे. राजाने प्रसन्न होऊन वर मागायला सांगितल्यावर श्रीयाळ शेठ यांनी केवळ दीड दिवसाचे (औट घटकेचे) राज्य मागितले. या अल्पकाळात त्यांनी खजिन्यातून मोडकळीस आलेल्या देवळांचा जीर्णोद्धार केला, गरिबांना अन्नदान व मदत करून राज्यात आनंद पसरवला.


त्याग, सेवा आणि अन्नदानाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देण्याचे मंडळाचे महत्त्वपूर्ण काम


केवळ मूर्ती साकारण्यावर न थांबता, त्यामागील त्याग, सेवा आणि अन्नदानाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम मंडळाने केले आहे. रात्रभर राबून ही संस्कृती पुन्हा जिवंत करणाऱ्या यशवंत कुंभार, धनाजी कुंभार, वसंत कुंभार, सुरेश केसरकर, बजरंग पाटोळे, वसंत खोत, रामा खोत, शशिकांत मोहिते, अप्पा रिंगणे, स्वप्निल रिंगणे, शेखर रिंगणे आणि पापा मुल्ला  यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे संपूर्ण गडहिंग्लज शहरातून व सांस्कृतिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.