Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ई-केवायसी अभावी वंचित राहिलेल्या 'लाडक्या बहिणींना' पुन्हा संधी द्या!

लाडकी बहीण योजने संदर्भात गडहिंग्लजला न्यू युवा मंचचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राज्यात विशेष लोकप्रिय ठरलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'त ई-केवायसी (e-KYC) न झाल्याने हजारो महिलांचे मानधन अचानक बंद झाले आहे. तांत्रिक माहितीच्या अभावामुळे वंचित राहिलेल्या या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी गडहिंग्लज येथील 'न्यू युवा मंच'च्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन अध्यक्ष काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.


शासनाने पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य देणारी लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाभार्थी हयात असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार महिलांनी सुरुवातीला केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, त्यानंतर शासनाने दुरुस्तीसाठी नव्याने लिंक खुली केली होती. या नवीन लिंकची पुरेशी माहिती न मिळाल्याने अनेक महिला वेळेत ई-केवायसी करू शकल्या नाहीत. परिणामी, कोणतीही चूक नसताना हजारो पात्र महिला या योजनेच्या लाभापासून आपोआप वंचित झाल्या आहेत.


सध्या या महिला मानधन पूर्ववत सुरू व्हावे यासाठी दररोज महिला व बालविकास कार्यालय, बँका आणि ऑनलाइन केंद्रांचे फेरे मारत आहेत. या गंभीर समस्येबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन वंचित बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


यावेळी न्यू युवा मंचचे अध्यक्ष काशिनाथ गडकरी, उपाध्यक्ष सागर कांबळे आणि सदस्य लक्ष्मण पाच्छापुरे उपस्थित होते. प्रांताधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक यांनी हे निवेदन स्वीकारले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.