Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संघर्ष जितका मोठा, तितके यश अधिक मोठे : डॉ. सागर चौगुले

गडहिंग्लजच्या कित्तूरकर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संघर्ष जितका मोठा, तितके यश अधिक मोठे असते. शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना अनुभवातून घडवणारे असावे. विद्यार्थी हा केवळ गुणांमध्ये नव्हे, तर एक सुजाण व चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. सागर चौगुले यांनी केले.


येथील विद्या प्रसारक मंडळाच्या रावसाहेबआण्णा कित्तूरकर ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. चौगुले बोलत होते.


विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता अनुभवातून शिकले पाहिजे. मन, हात आणि मेंदू यांचा योग्य समन्वय साधला तर जगात कोणतेही ध्येय साध्य करणे अशक्य नाही. गुणांपेक्षा उत्तम माणूस बनणे हेच शिक्षण पद्धतीचे खरे यश आहे,असा मोलाचा सल्ला डॉ. चौगुले यांनी यावेळी दिला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य उमेश सावंत यांनी प्रास्ताविक करताना कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दिनेश चिकुर्डे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.


अध्यक्षीय भाषणात विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी म्हणाले, जागृती शिक्षण संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी हा एक ब्रँड आहे. आमच्या संस्थेत केवळ पटसंख्येच्या संख्यात्मक विकासापेक्षा गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी सतत स्वतःला अपडेट ठेवून यशाकडे वाटचाल करावी.



गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

सोहळ्यात १२ वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या कु. अंबिका आरबोळे व कु. सृष्टी मोर्ती यांचा डॉ. सतीश घाळी आणि डॉ. सागर चौगुले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कु. मीनाक्षी कुंभार व कु. मधुरा पाटील या विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करत कॉलेजच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 


या सोहळ्याला ॲड. विकास पाटील, मुत्नाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे, माजी प्राचार्य श्रीरंग तांबे, डॉ. नागोजीराव चव्हाण, घाळी कॉलेजचे प्राचार्य डी. एम. पाटील, उपप्राचार्या विद्या पन्हाळे, माजी उपप्राचार्य सी. बी. कानडे, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, व्होकेशनल विभागप्रमुख गुरुलिंग खंदारे, ईएमसी विभागप्रमुख इजाज आजरेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अश्विनी पाटील व तेजस्विनी गारगोटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विभागप्रमुख स्वाती क्षीरसागर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.