Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रामतीर्थ तलावावर महागावच्या ग्रामस्थांचे 'जलसंवर्धन'

स्वच्छतेतून साधले पर्यावरण अन् आरोग्याचे रक्षण, शेकडो नागरिक एकवटले


'आपले गाव, आरोग्य संपन्न गाव' मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): 'गाव माझा, स्वच्छता माझी आणि आरोग्यही माझेच' या भावनेतून महागाव ग्रामपंचायतीने जलसंवर्धनाचा आणि स्वच्छतेचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. शासनाच्या 'एक दिवस - आपलं कुटुंब व गावाच्या आरोग्यासाठी' आणि 'आपले गाव, आरोग्य संपन्न गाव' या उपक्रमांतर्गत महागावचे प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या रामतीर्थ तलाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे संपूर्ण रामतीर्थ परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला आहे.



काही दिवसांपूर्वीच रामतीर्थ तलाव शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महागावचा मुख्य पाणीपुरवठा याच तलावावर अवलंबून असल्याने पाण्याचे स्त्रोत शुद्ध आणि प्रवाही ठेवण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले. तलावाच्या पात्रात व परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरलेली जलपर्णी (गारवेल) तसेच कचरा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींपासून ते सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत सर्वांनीच श्रमदान केले.



यापूर्वी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले होते. आता तलाव स्वच्छतेच्या या मोहिमेमुळे महागावच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



ऐक्याची ताकद आणि लोकसहभाग!


या श्रमदानात लोकनियुक्त सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य परशराम हुले, फिरोज सोलापूर, अर्जुन रेडेकर, पांडुरंग चौगुले, चाळू पाटील, दिनेश निकम, विजय खवरे या लोकप्रतिनिधींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी, उमेद अभियानातील महिला, पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते, विविध शेतकरी गट, ग्रामपंचायत कर्मचारी व शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.



नैसर्गिक पाण्याचे साठे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य!

महागाव हे तालुक्यातील एक अग्रगण्य आणि समृद्ध गाव आहे. रामतीर्थ तलाव, हिरण्यकेशी नदी आणि परशराम तलाव यांसारख्या विपुल जलस्त्रोतांमुळे कडक उन्हाळ्यातही गावाला कधी पाण्याची झळ पोहोचत नाही. हे नैसर्गिक पाण्याचे साठे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. याच उद्देशाने आम्ही रामतीर्थ तलावाच्या स्वच्छतेचा हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.


प्रशांत शिंदे

 लोकनियुक्त सरपंच, महागाव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.