Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लिंगायत समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक!

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा


महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या जाचक अटी शिथिल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन




मुंबई : लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या आणि आर्थिक-सामाजिक विकासाच्या प्रश्नांवर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विशेष पुढाकाराने समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापुरातील साखळी उपोषणापासून सुरू झालेला हा पाठपुरावा मुंबईतील बैठकीपर्यंत यशस्वी ठरला असून, मुख्यमंत्र्यांनी मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवत महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी शिथिल करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.



लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (९ ऑगस्ट) साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्याचवेळी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची गांभीर्यपूर्वक दखल घेत मंगळवारी मुंबईत विशेष बैठकीचे निमंत्रण दिले होते. आमदार पाटील यांच्या या मध्यस्थीमुळे कोल्हापुरातील आंदोलनाला थेट मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर स्थान मिळाले.


युवकांसाठी संधी आणि महामंडळाच्या योजनांचा विस्तार


मुंबईतील बैठकीदरम्यान शिष्टमंडळाने समाजाच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील सर्व घटकांना मिळावा. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करून जाचक अटी शिथिल कराव्यात. समाजातील तरुण पिढीला व्यवसाय, शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी शासनाकडून अधिकाधिक संधी व निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.


यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, समाजाला दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील, असे स्पष्ट केले.


या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात नगरसेवक संजय तेलनाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे,  मनोजकुमार रणदिवे, संतोष चिक्कोडे, राजशेखर तांबावे, सुरेश पाटील, शंकर बिराजदार, बसवराज कंकणवाडी, नितेश कोरी, अनिकेत चराटे, मल्लिकार्जुन आरबोळे, बंडू पाटील कडोले, सागर बंडगर, संजय जाधव, अविनाश पाटील, संतोष पाटील, विजय पाटील, प्रा. संजय पाटील आणि राजू खमलेटी यांचा समावेश होता.


कोल्हापुरातील आंदोलनापासून ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.