विद्यार्थ्यांनो, मैदानाशी घट्ट नाते जोडा : प्रा. चिदानंद कानडे
गडहिंग्लज (संपत सावंत) : हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथे जागृती बी.एड कॉलेज आंतरवासिता टप्पा-२ च्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक महंतेश दड्डी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर के. जुनियर कॉलेजचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक प्रा. चिदानंद कानडे तर राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सौरभ पाटील, अभिषेक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. चिदानंद कानडे यांच्या हस्ते झाले. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनपटावर आधारित भितीपत्रिकेचे उद्घाटन मुख्याध्यापक उमेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सौ.लीना वंटे यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ.माधुरी कुलकर्णी व सचिन मगदूम यांनी करून दिली.. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. चिदानंद कानडे म्हणाले," खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. खेळामुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना निर्माण होते. तो शारीरिक स्वास्थ्या सोबत मानसिक संतुलनही देतो. विद्यार्थ्यांनी दररोज खेळाशी, मैदानाशी नाते जोडावे" असा सल्ला देत मेजर ध्यानचंद यांच्या शिस्तबद्ध जीवनाचा, देशप्रेमाचा व हॉकी मधील अद्वितीय योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. क्रीडाशिक्षक संपत सावंत यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट उलगडला. महंतेश दड्डी यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याचे मार्ग सुचविले. सचिन माने यांनी सामुदायिक क्रीडा प्रतिज्ञा सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा सकान यांनी तर आभार सौ. नम्रता कांबळे यांनी मानले. यावेळी प्रा. पी. एस. होनगेकर,सौरभ पाटील, अभिषेक पवार, प्रकाश हरकारे, विनोद बिटकर, सौ. लक्ष्मी पाटील, सौ. प्रियांका नाईक, सौ. निलोफेर मुजावर, सौ .पूजा पवार,सौ. सायली काळे यांच्यासह खेळाडू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बी.एडचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

