हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोणत्याही खेळाचा विकास व्हायचा असेल, तर त्याचे खरे बाळकडू शालेय जीवनातच मिळणे अत्यंत गरजेचे असते. खेळातील अचूकता, मेहनत, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थीदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतो, असे प्रतिपादन गोगटे-वाकरे कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक व माजी विद्यार्थी प्रा. किशोर मैत्री यांनी केले.
हलकर्णी येथील हलकर्णी भाग हायस्कूल मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के. बी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. किशोर मैत्री उपस्थित होते.
स्वतःच्या अनुभवातून दिला यशाचा मंत्र
आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना प्रा. मैत्री म्हणाले की, याच हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी पोल व्हॉल्ट (बांबू उडी) या खेळाचे धडे घेतले. शालेय वयात संधी मिळाली नाही तरी हार न मानता महाविद्यालयीन शिक्षण घेताना अत्यंत कसून सराव केला आणि विद्यापीठ स्तरावर चॅम्पियनशिप मिळवली. या परिश्रमांच्या जोरावरच नॅशनल खेळाडू होण्याचा बहुमान कसा मिळाला, याचे प्रेरणादायी उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. क्रीडा क्षेत्रासोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यावर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हेही त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. एस. जी. पोतदार यांनी केले. याप्रसंगी शालेय मंत्रिमंडळातील कुमारी समृद्धी शिंत्रे व सिद्धी चौगुले या विद्यार्थिनींनी क्रीडा दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
यावेळी क्रीडा शिक्षक एस. बी. पाटील, एस. ए. पाटील, बी. एम. पवार, पी. एस. तांबडे, सौ. आर. आर. राम, ए. आर. पाटील, आर. जी. ढेरे, एस. बी. भोसले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा शिक्षक एस. बी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.




