Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आकृतीबंधामुळे आधुनिक शेती व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

१७ वर्षांनंतर कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध २३,४७६ पदांना मंजुरी




मुंबई : “बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरीकेंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे कृषी खात्याची व शेतकऱ्यांची कामे जलदगतीने होतील.  तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदल आणि ॲग्रीस्टॅकबाबत अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळेल. " अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २ हजार ६६८ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. कालबाह्य झालेली काही पदे रद्द करून आणि काही पदांमध्ये कपात करून हा आकृतीबंध तयार करण्यात आला असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे 92.6० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे कृषी विभागाचा हा सुधारित आकृतीबंध पूर्णत्वास आला आहे. यासाठी त्यांचे विशेष आभार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केले.


शेतकऱ्यांना मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे मिळावे यासाठी कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांसह विविध स्तरांवरील पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच कृषी यांत्रिकीकरण, मालमत्ता व्यवस्थापन आणि ॲग्रीस्टॅक यासाठी नवीन कृषी संचालनालयास मान्यता देऊन ६३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.


ॲग्रीस्टॅकचे काम गतिमान करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याचबरोबर हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘हवामान अनुकूल व शाश्वत शेती संचालनालय’ स्थापन करण्यास मान्यता देऊन ३५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.


तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकाऱ्यांना गट-अ दर्जा आणि एस-१९ वेतनश्रेणी देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कृषी विभाग अधिक गतिमान, आधुनिक आणि शेतकरीकेंद्रित होण्यास मोठी मदत होणार आहे.


सर्व कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करावी. तसेच कृषी विभागाच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.