Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'मांजा' बनला काळ, पण 'पास' टीम ठरली ढाल!

गडहिंग्लजमध्ये मांजात अडकलेल्या घुबडाची 'पास रेस्क्यू टीम' कडून सुटका




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कापाकापीच्या खेळात आकाशात भिरभिरणारा नायलॉन मांजा मुक्या पक्ष्यांसाठी कसा जीवघेणा ठरतो, याचा प्रत्यय आज गडहिंग्लजमध्ये पुन्हा एकदा आला. झाडावर मांजाच्या दोरीत गुंफलेला आणि मरणासन्न अवस्थेत धडपडणाऱ्या एका घुबडाला 'पास रेस्क्यू टीम'च्या तत्परतेमुळे सुखरूप जीवनदान मिळाले आहे. देवदूतासारख्या धावून आलेल्या या टीमने पक्ष्याला मांजाच्या विळख्यातून सोडवून सुखरूप वनविभागाच्या स्वाधीन केले.


नमके काय घडले?


आज (दिनांक ११ ऑगस्ट) दुपारी १२.०० च्या सुमारास गांधीनगर येथील हॉटेल ऐरावतसमोर असलेल्या विहिरीजवळील एका करंजाच्या झाडामध्ये एक घुबड मांजाच्या दोरीत अडकल्याचे गुरूप्रसाद नुलकर व प्रशांत भाटे यांच्या निदर्शनास आले. मांजा गळ्याभोवती व पायात घट्ट गुंफल्याने पक्षी वेदनेने धडपडत होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता याबाबतची माहिती पास रेस्क्यू टीमचे राहुल कारंडे यांना दिली.


काळजीपूर्वक केले रेस्क्यू


घटनेचे गांभीर्य ओळखून राहुल कारंडे आणि त्यांचे सहकारी लोकेश मंगणुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. झाडावर उंच अडकलेल्या घुबडाला अतिशय काळजीपूर्वक व सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्याच्या गळ्याला आणि पायाला चहूबाजूने लपेटलेल्या मांजाच्या दोऱ्या कौशल्याने कापून त्याला विळख्यातून मुक्त करण्यात आले. सुदैवाने प्राथमिक तपासणीत घुबडाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले.


यानंतर घटनेची सविस्तर माहिती वनविभागाचे अधिकारी सचिन सावंत यांना देण्यात आली. पुढील योग्य देखभाल आणि उपचारासाठी घुबडाला सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे.



मनाचा ठाव घेणारी साद: मुक्या जीवांचे संरक्षण हीच खरी माणुसकी!


आपल्या करमणुकीसाठी आणि पतंग उडवण्याच्या आवडीसाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा तीक्ष्ण मांजा निरपराध पक्ष्यांसाठी कायमचा 'काळ' ठरत आहे. आकाशात मुक्तसंचार करणाऱ्या या निष्पाप जिवांचे पंख छाटले जाऊ नयेत आणि त्यांचा वेदनादायी अंत होऊ नये, यासाठी नागरिकांनी मांजा वापरताना विशेष काळजी घ्यावी आणि बंदी असलेल्या प्राणघातक मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे कळकळीचे आवाहन 'पास रेस्क्यू टीम'ने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.