कै. बाबासाहेब नाडगोंडे सरकार ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): विद्या मंदिर धनगरवाडा बसर्गे येथे कै. बाबासाहेब नाडगोंडे सरकार ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल अशा मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या औचित्याने शाळा आवारात भव्य वृक्षारोपण तसेच नूतन केंद्रप्रमुखांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सौ. वर्षादेवी नाडगोंडे सरकार उपस्थित होत्या. त्यांच्याच शुभहस्ते सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते हिरवा संदेश!
कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात आले. इचलकरंजी येथील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सौ. पल्लवी घोलंगडे आणि कोल्हापूर येथील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सौ. बीना घोलप यांच्या शुभहस्ते रोपे लावून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
नूतन केंद्रप्रमुखांचा विशेष सत्कार
हलकर्णी केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडीसो यांचा श्रीमंत सौ. वर्षादेवी नाडगोंडे सरकार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी विद्या मंदिर धनगरवाडा बसर्गे येथील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचे मनापासून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
अखंड चालणारा ज्ञानाचा यज्ञ!
कै. बाबासाहेब नाडगोंडे सरकार ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे श्रीमंत सौ. अमृतादेवी नाडगोंडे सरकार यांच्या मोलाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या सामाजिक बांधिलकीबद्दल ग्रामस्थांनी नाडगोंडे सरकार कुटुंबाचे विशेष आभार मानले.
बाळासाहेब वालीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून उपक्रमामागील भूमिका विशद केली. मुख्याध्यापक देवेंद्र उपाध्ये यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेश नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवानंद मर्डी, रामापा धनगर, बिरापा मुसाई यांच्यासह गावातील पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


