Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भावी मतदारांचा 'पावर प्ले'! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीचा जल्लोष

किरण आरबोळे आणि शर्वरी भोसले यांची विजयी 




मुगळी (वार्ताहर): न्यू इंग्लिश स्कूल, मुगळी येथे शालेय जिमखाना मंडळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत किरण मल्लाप्पा आरबोळे (१० वी) याने जनरल सेक्रेटरी (जी.एस.) पदावर, तर कु. शर्वरी यशवंत भोसले (१० वी) हिने लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह (एल.आर.) पदावर बहुमताने दणदणीत विजय संपादन केला.



विद्यालयात पार पडलेल्या या लोकशाही महाउत्सवात विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जी.एस. व एल.आर. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून प्रचार, मतदार संवाद, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी उत्साहात पार पाडली.



प्र. मुख्याध्यापिका सौ. घोरपडे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक घोषित करण्यात आले. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.



या निवडणूक प्रक्रियेचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून सुरसेन प्रियदर्शी यांनी प्रभावी नियोजन केले, तर सागर एस. के. यांनी विशेष सहकार्य केले. केंद्र प्रमुख म्हणून प्र. मुख्याध्यापिका सौ. घोरपडे यांनी जबाबदारी सांभाळली. निवडणूक अधिकारी म्हणून सौ. कंदगल, सौ. खडकेकर, सौ. शिंदे व एम.डी. रणनवरे यांनी काम पाहिले. मतमोजणी प्रक्रिया लेखनिक सागर प्रभावळे, दत्तात्रय संघमित्र आणि अजित जाधव यांनी पारदर्शकपणे पार पाडली.



लोकशाही केवळ पुस्तकात नसून ती प्रत्यक्ष जगण्यातून शिकायची असते, याचा प्रत्यय या अभिनव उपक्रमातून मुगळीतील विद्यार्थ्यांनी घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.