अनघा सुतार एकाच वर्षात बनली ४ विभागांची अधिकारी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि स्वतःवर दृढ विश्वास असेल तर यशाची दारे कशी उघडतात, याचे जिवंत उदाहरण गडहिंग्लजच्या अनघा शिवाजी सुतार हिने दाखवून दिले आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत तिने अवघ्या एका वर्षात तब्बल चार महत्त्वाच्या शासकीय पदांना गवसणी घातली आहे. तिच्य़ा या उत्तुंग यशामुळे गडहिंग्लज शहरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निवड झालेली चार शासकीय पदे
राज्य कर निरीक्षक (STI)
दुय्यम निबंधक (Sub-Registrar),
धर्मादाय आयुक्तालय - निरीक्षक,
भूमी अभिलेख विभाग - भूकरमापक (LSR)
शिक्षणाचा पाया अन् कौटुंबिक पार्श्वभूमी
अनघाचे प्राथमिक शिक्षण 'जागृती प्राथमिक विद्यालय' तर माध्यमिक शिक्षण 'जागृती हायस्कूल'मध्ये झाले. त्यानंतर तिने इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. तिला शिक्षणाचे आणि शिस्तीचे धडे घरातूनच मिळाले. तिच्या आई 'जागृती प्राथमिक विद्यामंदिरा'च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असून, वडील कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक आहेत. कुटुंबाचे भक्कम पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन तिच्या या यशात मोलाचे ठरले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुण-तरुणींसाठी अनघाचे हे यश खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभ आणि प्रेरणादायी वस्तुपाठ ठरले आहे.
यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जिद्द, शिस्त, चिकाटी, एकाग्रता आणि प्रयत्नांमधील सातत्य या पायऱ्या चढूनच ध्येय गाठता येते.
-अनघा सुतार

