Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी ते लंडन... ८ हजारांचे कर्ज ते 'लॉर्ड्स'वरील गौरव; राहुल घेवारी यांची ध्येयवेडी यशोगाथा!

'लॉर्ड्स'वर पुरस्कार स्वीकारताना भावूक; वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना




गडहिंग्लज (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर ग्रामीण भागातील तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी गरुडझेप घेऊ शकतो, याचा वस्तुपाठ गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावचे सुपुत्र राहुल दुंडाप्पा घेवारी यांनी घालून दिला आहे. 'स्मार्ट अश्युर इन्शुरन्स सर्व्हिसेस'चे संस्थापक राहुल घेवारी यांना विमा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ब्रिटनमधील ऐतिहासिक 'लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड'वर 'पॉलिसीबाजार'च्या वतीने प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


श्री. घेवारी यांची विमा क्षेत्रात मोठी भरारी

श्री. घेवारी यांनी विमा क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून आज त्यांची 'स्मार्ट अश्युर इन्शुरन्स सर्व्हिसेस' नावाची स्वतःची इन्शुरन्स कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात केला असून विविध ठिकाणी या कंपनीची कार्यालये आहेत. गडहिंग्लज शहरात देखील कंपनीचे कार्यालय कार्यरत असून विमा क्षेत्रात या कंपनीने आघाडी घेतली आहे. याचा सार्थ अभिमान तेरणीकरांना आहे. 


तेरणी गावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले 


लंडनच्या भूमीवर हा जागतिक सन्मान स्वीकारताना तेरणी गावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. "एक कट्टर क्रिकेटपटू असल्याने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पुरस्कार स्वीकारणे हा माझ्यासाठी 'सोने पे सुहागा' क्षण होता," अशा शब्दांत घेवारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



वडिलांना वाहिलेली खरी श्रद्धांजली


आपल्या या यशाबद्दल बोलताना राहुल घेवारी भावूक झाले. "माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी इंजिनिअर बनून लंडनला कामासाठी जावे. मी इंजिनिअर होऊ शकलो नाही याची खंत मनात होती, पण त्यांचे लंडनला जाण्याचे स्वप्न पूर्ण करायची जिद्द मी कधीच सोडली नाही. आज लंडनमध्ये हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असून, त्यांना हीच माझी खरी श्रद्धांजली आहे," असे त्यांनी नमूद केले.


'८ हजार अन् ते दोन जामीनदार...'; घेवारींनी व्यक्त केली कृतज्ञता


सन २००० मध्ये मला एमबीएच्या प्रवेशासाठी ८ हजार रुपये कमी पडत होते. कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती आणि कोणीही जामीनदार राहत नव्हते. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत गावातील कै. सिद्रामय्या औरगोळ आणि जब्बार मुल्ला यांनी एका पतसंस्थेत जामीनदार म्हणून सही केली आणि मला कर्ज मिळाले. तेरणी गावाचे आणि या दोन व्यक्तींचे माझ्या आयुष्यात खूप मोठे योगदान आहे. जन्मभूमीचे नाव लंडनमध्ये उज्वल करता आले, याचा मला अभिमान वाटतो.

- राहुल दुंडाप्पा घेवारी

संस्थापक, स्मार्ट अश्युर इन्शुरन्स

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.