केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी यांचे कडलगे शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
वृक्षारोपण अन् परिपाठ पुस्तिकांचे वाटप उत्साहात
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वप्नं नेहमी मोठी पाहिली पाहिजेत. मुलांनी मानसोक्त खेळावे, उत्तम खावे, पण त्याचसोबत दररोज किमान दोन तास तरी मन लावून आणि एकाग्रतेने अभ्यास केलाच पाहिजे, असा आपुलकीचा अन् मोलाचा सल्ला नूतन केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी यांनी दिला.
विद्या मंदिर कडलगे (ता. गडहिंग्लज) शाळेत तेरणी गावचे सुपुत्र आणि नूतन केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन कडलगे प्रशालेच्या वतीने श्री. यादगुडी यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन आणि खेळाचे महत्त्व पटवून देत भविष्यात मोठी ध्येये उराशी बाळगण्याचे आवाहन केले.
परिपाठ पुस्तिकांचे वाटप व वृक्षारोपण
कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता काळगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व रोजच्या शिस्तीसाठी खास स्वतः तयार केलेल्या 'परिपाठ पुस्तिकांचे' वाटप करण्यात आले. या पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांच्या रोजच्या परिपाठात अधिक सुसूत्रता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी यांच्या शुभहस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. रोपे लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला.
या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



