रोझरी इंग्लिश स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
विविध राज्यातील संस्कृतीचे घडले दर्शन
आजरा ( हसन तकीलदार): भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशातील विविध राज्ये, तिथली खाद्यसंस्कृती, लोकनृत्य आणि पेहराव वेगळा असला, तरी आपण सर्व एक आहोत, हाच संदेश आजरा येथील रोझरी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कलाविष्कारातून दिला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये 'विविधतेतील एकता' या संकल्पनेवर आधारित अत्यंत प्रेक्षणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. महाराष्ट्र पोलीस दलात नुकतीच भरती झालेली रोझरीची माजी विद्यार्थिनी न्यूरल डिसोझा हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. "मिळालेल्या यशावर अथवा पदावर समाधानी न राहता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उत्तुंग यश मिळवून मोठ्या पदांवर झेप घ्यावी," असे प्रेरक आवाहन न्यूरल डिसोझा हिने आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्टीन फर्नांडिस तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर उपस्थित होते. शाळेचे मॅनेजर फादर नेलव्हिन पायस यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत शिक्षकांनी केलेल्या अचूक नियोजनाचे कौतुक केले.
शिक्षकांचे विशेष परिश्रम व राज्यांचे प्रतिनिधित्व
शाळेतील प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी भारताच्या विविध राज्यांची संस्कृती हुबेहूब साकारली:
तामिळनाडू: ज्युनियर कॉलेज (स्मिता पाटील)
तेलंगणा: १० वी (विजय केसरकर)
कर्नाटक: ९ वी (शैलजा कांबळे)
पंजाब: ८ वी (संयोगिता वाळके)
बंगाल: ५ वी (आशिष फर्नांडिस)
जम्मू-काश्मीर: एस.आर.के.जी. (अवेलीन मंतेरो)
नागालँड: ३ री (एलीझाबेथ फर्नांडिस)
गोवा: १ ली (सांचेझ डिसोझा)
ओडिसा: ज्युनियर के.जी. (रिझवाना काकतिकर)
महाराष्ट्र: ४ थी (जेसीका कुतिन्हो)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसीका कुतिन्हो यांनी केले, तर पाहुण्यांचे स्वागत व परिचय स्टीफन डिसोझा यांनी करून दिला. या सोहळ्याला मुख्याध्यापक मनवेल बारदेस्कर, डॉन्मिक डिसोझा, सांझेस कुतिन्हो, स्टीफन फेर्नांडिस, ब्रदर जितन यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सौ. शैलजा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



