शाहू सभागृहात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान रंगणार 'दृष्टी सृष्टी' प्रदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): छायाचित्रण म्हणजे केवळ कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये टिपलेला क्षण नसून ते समाजजीवनाचे जिवंत प्रतिबिंब असते. याच सामाजिक भान आणि कलात्मक दृष्टीचा अविष्कार घडवणारे गडहिंग्लज येथील प्रसिद्ध छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांचे ‘दृष्टी सृष्टी’ हे भव्य छायाचित्र प्रदर्शन शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट ते सोमवार ३१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या श्री शाहू सभागृहात हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.
शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता या प्रदर्शनाचा शानदार उद्घाटन सोहळा रंगणार आहे. दैनिक ‘सकाळ’ (कोल्हापूर) चे संपादक निखिल पंडितराव यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
दिग्गजांची असणार प्रमुख उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला गडहिंग्लजसह परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये नगरपरिषदेचे प्र. नगराध्यक्ष महेश सलवादे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमोल पाटील, संस्कार शिक्षण समुहाचे अध्यक्ष सुनिल कुराडे, दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टच्या सचिव प्रा. सौ. स्वाती कोरी, केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे सचिव अनिरूद्ध रेडेकर, रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, सारथी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, साधना शिक्षण संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर, हिरण्यकेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती कावेरी चौगुले, सिटी हॉस्पिटलचे डॉ. नरेंद्र पाटील, सूर्या फ्युअल्सचे सुरेश कोळकी, दड्डी ज्वेलर्सचे संतोष दड्डी, फिजिक्स जिमचे अमीर नदाफ आणि शेख बिर्याणीचे बशीर शेख यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कॅमेऱ्याच्या लेंसमधून टिपलेली विविध रूपे, निसर्गरम्य दृश्ये आणि मानवी भावनांचा अनमोल ठेवा या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या कलात्मक मेजवानीचा गडहिंग्लज शहर व परिसरातील छायाचित्रणप्रेमी, रसिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

