येणेचवंडी येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण व हॉलचे लोकार्पण
स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ठरणार वरदान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपल्या पोटच्या मुलाच्या अचानक जाण्याने झालेली दुःखाची जखम मनात बाळगण्यापेक्षा, त्याच्या आठवणींना समाजोपयोगी कार्यातून उजाळा देण्याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व प्रेरणादायी वस्तुपाठ येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील कळेकर कुटुंबाने घालून दिला आहे. मौजे येणेचवंडी येथील श्रीमती शकुंतला शिवाजीराव कळेकर यांनी आपले सुपुत्र कै. संतोष शिवाजीराव कळेकर यांच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी गावातील वाचनालयाकरिता स्वखर्चाने प्रशस्त हॉल बांधून दिला. या नूतन हॉलचे लोकार्पण आणि स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण देणगीदार श्रीमती शकुंतला कळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय बिरंजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेच्या सेक्रेटरींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावातील विद्यार्थ्यांना, विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासाची सोय व्हावी या उद्देशाने या हॉलचा वापर अभ्यासिका म्हणून केला जाणार आहे.
माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांनी कळेकर कुटुंबाच्या या औदार्याचे मनापासून कौतुक केले. कै. संतोष कळेकर हे वाचनालयाचे नियमित वाचक होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी एका आईने दाखवलेल्या दातृत्वाला वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने समर्थ साथ दिली, म्हणूनच हा सुंदर हॉल साकार झाला,असे नाईक यांनी नमूद केले. तसेच या हॉलसाठी ध्वनी सामग्री भेट देणारे संभाजीराव लोंढे यांचाही त्यांनी विशेष उल्लेख करून आभार मानले.
कारागीर व देणगीदारांचा गौरव
या सोहळ्यात उदात्त देणगी दिल्याबद्दल श्रीमती शकुंतला कळेकर यांचा सत्कार संस्थेचे संचालक सदाशिव कुराडे व सरपंच दीपाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच हॉलचे उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल कारागीर श्रीधर लोहार यांचा सत्कार बाळेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष आनंदा कुराडे, ए. एम. कुराडे, रामकृष्ण देसाई, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक तसेच ग्रंथपाल विजय इंगळे, लिपिक श्रीकांत मांगले, शिपाई परशुराम भोसले, संगीता इंगळे, शीला इंगळे, चंद्रदीप देसाई, सुरेश नलवडे, अरविंद लोंढे, संजय शिंदे, दत्तात्रय लोंढे यांच्यासह येणेचवंडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दशरथ बाळू राऊन यांनी आभार मानले. आईने मुलाच्या नावाने दिलेली ही अनोखी ज्ञानभेट संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.



