Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवर्डे हायस्कूलमध्ये 'झेन अल्फा'कडून जादूच्या प्रयोगांमागील अंधश्रद्धेची चिरफाड!

अंनिसच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात साजरा; कॉ. काशिनाथ मोरे यांच्याकडून प्रयोगांची पोलखोल




आजरा (हसन तकीलदार): डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदान दिनानिमित्त देवर्डे (ता. आजरा) येथील हायस्कूलमध्ये आयोजित 'वैज्ञानिक दृष्टिकोन दिना'च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार एल्गार पुकारला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने आयोजित या कार्यक्रमात कॉ. काशिनाथ मोरे यांनी जादूचे विविध प्रयोग सादर करत त्यामागील भोंदूगिरी उघडी पाडली. तर, आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर या प्रयोगांमागील वैज्ञानिक तथ्ये शोधून काढून अंधश्रद्धेची चिरफाड केली.



कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात 'अंनिस'चे तालुका उपाध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी देशातील अनिष्ट रूढी-परंपरा, जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधात आयुष्यभर प्रबोधन केले. दुर्दैवाने त्यांची हत्या झाली, तरीही त्यांचे विचार समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम अंनिस संघटना सातत्याने करत आहे.


जादूचे चमत्कार की केवळ विज्ञान?


कार्यक्रमात अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष कॉ. काशिनाथ मोरे यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले. तांब्यातून अचानक पाणी गायब करणे, केवळ नजरेच्या ताकदीने केळीचे तुकडे करणे, डोळे घट्ट बांधलेले असतानाही संख्या अचूक ओळखणे हे प्रयोग पाहून उपस्थितांमध्ये सुरुवातीला उत्सुकता निर्माण झाली. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रगल्भ जाणीव असलेल्या हायस्कूलच्या मुलींनी या सर्व प्रयोगांमागील हातचालाखी व वैज्ञानिक तत्त्वे ओळखून दाखवली. आपण खऱ्या अर्थाने 'झेन अल्फा' पिढी आहोत हे दाखवून देत मुलींनी प्रयोगांची पोलखोल केली. या हुशारीबद्दल कॉ. मोरे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि समाजात बाबा-बुवांच्या भोंदूगिरीला बळी न पडता सावध राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.



या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला कॉ. संजय घाटगे, मुख्याध्यापक सी. बी. धुरे, एम. एम. नावलगी, धनाजी चाळके, राजू गुरव, मारूती बुरूड, शरद परूळेकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन आर. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार डी. एम. शिखरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.