आजरा (हसन तकीलदार): आजरा तालुक्यातील मडिलगे येथे चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करत पोलिसांना उघडे आव्हान दिले आहे. बंद घरातील तिजोरी फोडून अज्ञात भामट्याने तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. ही धक्कादायक घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४५ ते ११:१५ या अवघ्या दीड तासाच्या कालावधीत घडली असून या प्रकारामुळे संपूर्ण गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी रेश्मा संतोष घाडगे (वय ३७, रा. मडिलगे) यांनी आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने जनावरांच्या गोठ्यातील उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात प्रवेश केला. घरातील खोलीतील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला.
चोरीस गेलेल्या ऐवजांमध्ये अडीच तोळे सोन्याचे गंठण (१ लाख ५० हजार रुपये किमतीचे), दीड तोळ्याची स्वस्तिक लॉकेट असलेली चेन (९० हजार रुपये किमतीची), अर्धा तोळ्याची मण्यांची लाखी बोरमाळ (३० हजार रुपये किमतीची), रोख रक्कम २५ हजार रुपये (५०० रुपयांच्या ५० नोटा) असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आजरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १९५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार हजारे यांनी फिर्याद नोंदवून घेतली असून, पोलीस हवालदार येळकर हे या चोरीचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे मडिलगे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

