चंदगड (प्रतिनिधी): शांत आणि नयनरम्य चंदगड तालुक्याचा निसर्गरम्य परिसर पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या काळ्या धंद्याने हादरला आहे. हाजगोळी येथील एका पोल्ट्री फार्मच्या नावाखाली छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज निर्मितीच्या भयंकर कारखान्याचा पुणे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने पर्दाफाश केला. शनिवारी सायंकाळी टाकलेल्या या धाडसी छाप्यात कोट्यवधींच्या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला असून, पोल्ट्री मालकासह आंतरराज्यीय नेटवर्क चालवणाऱ्या ९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मुंबईतील कुर्ला कनेक्शनने उघड केला आंतरराज्यीय कट
काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला भागात पकडल्या गेलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशीतून या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेडोरे थेट चंदगडच्या सीमेवरील हाजगोळी गावापर्यंत पोहोचले होते.
साध्या वेशातील गस्त
पुणे टास्क फोर्सचे पथक गेल्या ४८ तासांपासून साध्या वेशात चंदगड परिसरात पाळत ठेवून होते. शुक्रवारी रात्री संशयावरून काही स्थानिकांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच पोल्ट्रीतील गुप्त कारखान्याचे बिंग फुटले.
नऊ जणांना घेतले ताब्यात
पोल्ट्री मालक यांच्यासह मुंबईतील ३ आणि बेळगावच्या २ बड्या तस्करांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरा पर्यंत पोलीस अधीक्षक एम. ए. मकानदार, डीवायएसपी विवेक पाटील, पीआय निंगाप्पा चौखंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी थांबून तपासाचे सूत्र हालवली.
जुन्या आठवणींनी तालुका पुन्हा हादरला
याआधी अशाच प्रकारे दोन ठिकाणी ड्रग्ज कारखान्यांवर कारवाया झाल्या होत्या. दुर्गम आणि सीमावर्ती भागाचा फायदा घेत अमली पदार्थांचे नेटवर्क तयार करणाऱ्या या टोळ्यांमुळे चंदगड तालुका ड्रग्ज माफियांचे हक्काचे ठिकाण बनतेय का, असा संतप्त सवाल आता स्थानिक विचारत आहेत. या छाप्यामुळे मुंबई-चंदगड-बेळगाव या 'अमली कॉरिडॉर'चे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

