संग्रहीत छायाचित्र
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावच्या सीमावर्ती आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या एका भव्य गोरखधंद्याचा महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, पुणे पथकाने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत गुप्त कारखान्यावर धाड टाकून तब्बल १०० कोटी रुपये मूल्याचे ५० किलो MD (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, या कारवाईने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.
कारखान्यावर धाड, ६ जणांना ताब्यात
गुप्त माहितीच्या आधारे पुणे पथकाने हाजगोळी येथील ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ६ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे रॅकेट ग्रामीण आणि सीमावर्ती भागाच्या शांततेचा फायदा घेत अंमली पदार्थांचे उत्पादन करत असल्याचे समोर आले आहे.
निर्मितीचे मोठे साहित्य आणि रसायने जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाने घटनास्थळावरून MD ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा प्रचंड साठा आणि उपकरणांची जप्ती केली आहे. ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी विविध प्रकारची घातक रसायने आणि लिक्विड, काचेची वैज्ञानिक उपकरणे, इलेक्ट्रिक हिटर, डिजिटल वजनकाटे, मिक्सर, ड्रिलसदृश विशेष मशीन्स आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
या कारवाईमुळे सीमावर्ती भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर अंमली पदार्थ नेटवर्कचे धाबे दणाणले आहेत. या कारखान्यामागे कोणते मोठे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे, याचा सखोल तपास सध्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून केला जात आहे.

