कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील गेली अनेक दशके प्रलंबित असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील 'हेरे सरंजाम'चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्याबद्दल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा चंदगड मतदारसंघातील लाभधारकांच्या वतीने भव्य आणि कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल विभागाच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमादरम्यान हा विशेष सत्कार सोहळा पार पडला.
हजारो कुटुंबांना मिळाला हक्काचा दिलासा
हेरे सरंजामचा प्रश्न हा केवळ जमिनीच्या कागदपत्रांशी किंवा महसुली नोंदींशी संबंधित विषय नव्हता. या भागातील हजारो कुटुंबांच्या हक्काचा, त्यांच्या सुरक्षित भविष्याचा आणि अनेक पिढ्यांपासून चाललेल्या संघर्षाचा तो मुख्य आधार होता. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्यामुळे चंदगड तालुक्यातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
शासनाची सकारात्मक भूमिका ठरली निर्णायक
या गुंतागुंतीच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक आणि गतिमान भूमिका घेतली. शासन स्तरावर सातत्याने झालेल्या विशेष बैठका, पाठपुरावा आणि प्रशासकीय पातळीवरील सुयोग्य समन्वयामुळेच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या बाधित कुटुंबांना अखेर न्याय मिळाला आहे.
लाभधारकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हेच या संपूर्ण प्रयत्नांचे खरे फलित - आमदार शिवाजी पाटील
सत्कार प्रसंगी बोलताना आमदार शिवाजी पाटील म्हणाले, आज लाभधारकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हेच या संपूर्ण प्रयत्नांचे खरे फलित आहे. हेरे सरंजाम लाभधारकांनी महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा केलेला हा सत्कार केवळ एक औपचारिक सोहळा नसून, हजारो कुटुंबांच्या मनातील प्रामाणिक कृतज्ञतेची भावना आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि संपूर्ण महसूल प्रशासनाचे चंदगड मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
या जनसंवाद कार्यक्रमास आणि सत्कार सोहळ्याला आ. अशोकराव माने, आ. राहुल आवाडे, आ. अमल महाडिक, नाथाजी पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह चंदगड परिसरातील नागरिक आणि लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





