हजारांहून अधिक नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून तात्काळ दिलासा
शेवटचा नागरिक मिळेपर्यंत व्यासपीठ सोडणार नाही - मंत्री बावनकुळे
कोल्हापूर (प्रतिनिधी): जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत हे व्यासपीठ सोडणार नाही," असा भक्कम आधार देत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी कोल्हापुरातील नागरिकांची मने जिंकली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित 'जनसंवाद' कार्यक्रमात हजारो नागरिकांच्या तक्रारी व निवेदने अत्यंत नम्रतेने आणि आपुलकीने स्वीकारत त्यांनी प्रशासकीय दिलासा दिला. मंत्र्यांच्या या तत्परतेवर "साहेब... एकच नंबर काम!"अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
रविवारची सुट्टी असतानाही दुपारी दोन वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या नागरिकांची तुफान गर्दी जमली होती. दुपारी चारच्या सुमारास महसूल मंत्र्यांचे आगमन झाल्यावर प्रांगणात नागरिकांचा जनसागर उसळला. चेहऱ्यावर कोणताही त्रागा न आणता मंत्री बावनकुळे यांनी प्रत्येक नागरिकाचे निवेदन स्वीकारले. ज्या बाबी शक्य आहेत तिथे तात्काळ आश्वासक दिलासा दिला, तर जिथे अडचणी आहेत तिथे स्पष्ट वस्तुस्थिती मांडत नागरिकांशी थेट संवाद साधला.
या जनसंवाद कार्यक्रमात १,००० हून अधिक निवेदने स्वीकारण्यात आली. राज्य महसूल मंत्र्यांनी स्वतःहून दाखवलेल्या या आपुलकीमुळे दूरवरून आलेल्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसून येत होते.
या प्रसंगी आमदार सर्वश्री अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले आणि डॉ. समीर शिंगटे यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



