कडगाव- गडहिंग्लज मार्गावर 'मॉर्निंग वॉक' करताना पाठीमागून धडक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): रोजच्याप्रमाणे पहाटेच्या शांत वातावरणात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका वृद्धावर काळाने घाला घातला. कडगाव-गडहिंग्लज रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या एका बेदरकार डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आकाराम संतराम पाटील (वय ६५, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) असे या अपघातात प्राण गमावलेल्या दुर्दैवी वृद्धाचे नाव असून या घटनेने कडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आकाराम पाटील हे कडगाव ते गडहिंग्लज जाणार्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ते कडगाव हद्दीतील 'तीन चिंचेच्या जवळ' आले असता, गडहिंग्लजच्या दिशेने जाणार्या डंपरने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, हयगयीने व अत्यंत भरधाव वेगाने पाठीमागून पाटील यांना जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडकेमुळे आकाराम पाटील यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला.
याप्रकरणी अमित आकाराम पाटील (वय ३८, व्यवसाय-शेती, रा. कडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपर चालक याच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता शिंदे करत असून प्राथमिक नोंद महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल गाडे यांनी केली आहे.

