आजरा (प्रतिनिधी): उत्तूर (ता. आजरा) येथील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या बसस्थानकाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन प्रवासी संघटनेच्या वतीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, एसटी प्रशासनाला १ महिन्याची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांनी दिला आहे.
उत्तूर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे व परिसराचे काम रखडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. याविरोधात १८ ऑगस्ट पासून प्रवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. सलग १० दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान एसटी महामंडळाच्या आजरा आगार प्रमुखांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. उत्तूर ग्रामपंचायतीने कामाला दिलेली स्थगिती मागे घेतल्यानंतर तात्काळ बांधकाम सुरू करण्यात येईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती.
मात्र, प्रशासनाकडून काम सुरू होण्याच्या निश्चित तारखेबाबत कोणतीही स्पष्टता न मिळाल्याने प्रवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आणि जनहित लक्षात घेऊन संघटनेने महामंडळाला एका महिन्याची मुदत दिली आहे. या दिलेल्या मुदतीत रखडलेले बांधकाम प्रत्यक्ष सुरू झाले नाही, तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. त्यावेळी निर्माण होणाऱ्या सर्व परिणामांना आणि परिस्थितीला एसटी महामंडळच जबाबदार राहील, असा थेट इशारा कॉ. शिवाजी गुरव यांनी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

