Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज आठवडा बाजारातील बेशिस्त बाहेरील व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी

रस्ते व गल्लीतील अतिक्रमणामुळे रहिवाशांना नाहक त्रास


स्थानिक रहिवाशांचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): गडहिंग्लज शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामध्ये काही बाहेरील व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या बेशिस्तपणामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाजार भरविण्यास नागरिकांचा विरोध नसून, व्यापाऱ्यांनी निश्चित केलेल्या जागेतच शिस्तबद्ध पद्धतीने व्यवसाय करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत गडहिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे व पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना स्थानिक रहिवाशांनी निवेदन आहे.


निवेदनात म्हटले आहे की, शहरातील लक्ष्मी रोड, कचेरी रोड, गुणे गल्ली,शिवाजी बँक जवळ व टिळक पथ या परिसरातील रस्ते व गल्ल्या अरुंद असल्याने व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर पुढे येऊन दुकाने लावल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.


काही बाहेरील व्यापारी बाजार संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकून जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होत आहे. तसेच पान-सुपारी खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, परिसर अस्वच्छ करणे आणि स्थानिक नागरिकांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणे, अशा प्रकारांवर आळा घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.


व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे; मात्र स्थानिक नागरिकांच्या हक्काच्या रस्त्यावर अतिक्रमण न करता, प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेत आणि नियमांचे पालन करूनच व्यवसाय करावा, यासाठी प्रशासनाने ठोस शिस्त लावावी. बाजार संपल्यानंतर व्यापाऱ्यांनी निर्माण केलेला कचरा त्यांच्याकडूनच उचलून घेण्याची व्यवस्था करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 



यावेळी प्रितम कापसे, संदीप कुरळे, सचिन घोगरे, सुदर्शन चव्हाण,संतोष कुंभार,हेमंत रांगणेकर, रोहित चव्हाण, गोपी कमनुरे, नितेश झेंडे, दीपक देसाई, विशाल पाटील, आलोक शिंदे, अझहर बोजघर यांच्यासह संबंधित परिसरातील नागरिक व व्यापारी उपस्थित होते.


आठवडे बाजार सुरू राहावा, मात्र त्याचवेळी स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही आणि शहराची स्वच्छता व वाहतूक व्यवस्था अबाधित राहील, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन व कडक अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.