Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाडूचा सुवास, रंगांची उधळण... गडहिंग्लजच्या कारखान्यांत आकारास येतोय 'श्रीं'चा थाट!

गणेशमूर्ती कारागीरांची लगबग!




गडहिंग्लज (प्रतिनिधी): लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असल्याने सीमाभागातील प्रमुख केंद्र असलेल्या गडहिंग्लज शहरासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती साकारण्याच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. कारखान्यांमध्ये दिवस-रात्र मूर्तींवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू असून, मूर्तिकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मोठी धांदल उडालेली पाहायला मिळत आहे.


शाडूच्या मूर्तींना वाढती पसंती


पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देत यंदा बहुतांश मूर्तिकारांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यावर भर दिला आहे. पारंपरिक रूपांसोबतच भाविकांच्या पसंतीस उतरतील अशा आकर्षक आणि विविध आकारांतील मूर्ती सध्या कार्यशाळांमध्ये आकारास आल्या आहेत.


अडसर पावसाचा, जिद्द मूर्तिकारांची


सध्या बहुतांश मूर्तींचे काम पूर्ण झाले असून लवकरच रंगाचा पहिला हात मारण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मातीच्या मूर्ती सुकण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. वातावरणातील या ओलसरपणावर मात करत गणेशोत्सवापूर्वी मूर्ती वेळेत तयार करण्यासाठी कलाकार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.


किमतीत अल्पशी वाढ


उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि कच्च्या मालाचे दर गगनाला भिडल्याचा फटका या वर्षी मूर्ती व्यवसायालाही बसला आहे. मूर्तीसाठी लागणारी शाडू माती, वाहतूक खर्च आणि उच्च दर्जाच्या रंगांचे भाव वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता मूर्तिकारांनी वर्तवली आहे.


अंतिम टप्प्यातील कामे जोरात


मूर्ती घडवणे, सुकवणे, रंगकाम, डोळे आखणी आणि दागिन्यांची सजावट अशा विविध टप्प्यांवर सध्या कामे अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या मनमोहक मूर्ती भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान होण्यासाठी सज्ज होतील. उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज परिसरातील सर्वच मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.