Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन



कोल्हापूर (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक के. एम. गिऱ्हे यांनी केले आहे.


महामंडळाच्या मुख्य कंपनी तसेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण बहुउद्देशीय आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत २५ टक्के बीज भांडवल कर्ज योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, १ लाख रुपये थेट कर्ज योजना आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत.


व्याज परतावा योजनेंतर्गत संपूर्ण कर्ज बँकेमार्फत दिले जाईल. लाभार्थ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केल्यास कमाल १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज महामंडळाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, www.vnvjntdc.org या संकेतस्थळावर ‘नोंदणी’ पर्याय निवडून अर्ज भरता येईल. आवश्यक कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावीत.


१ लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गत संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. या योजनेत दरमहा २,०८५ रुपये प्रमाणे ४८ समान मासिक हप्त्यांची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही. मात्र, थकित हप्त्यांवर वार्षिक ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.


योजनांबाबत अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, खोली क्र. २, विचारेमाळ, कावळा नाका (ताराराणी चौक), कोल्हापूर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६६२३१३ वर संपर्क साधावा. तसेच महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.