Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उत्तूर बसस्थानकाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करा; अन्यथा १८ ऑगस्टपासून बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन!

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांचे आजरा आगार प्रमुखांना निवेदन




आजरा (प्रतिनिधी ): उत्तूर व परिसरातील तब्बल ४० गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उत्तूर बसस्थानकाचे नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून ठप्प पडले आहे. प्रशासनाच्या या मनमानी आणि दुर्लक्षित कारभाराविरोधात कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या १८ ऑगस्ट पासून उत्तूर येथे बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन छेडण्याचा इशारा आजरा एस.टी. आगार प्रमुखांना कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून उघड्यावर राहिलेले बांधकामाचे लोखंडी सांगाडे आणि सळ्या पावसाच्या पाण्याने गंजून जात आहेत. अशाच स्थितीत उद्या काम पुन्हा सुरू केल्यास भविष्यात ही इमारत अपघातास कारणीभूत ठरून प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते.


'सायलेंट झोन'चे निमित्त अन् प्रवाशांचे हाल!


उत्तूर बसस्थानक हे काही आज नवीन होत नसून गेल्या ६० ते ७० वर्षांपासून याच जागेवर आहे. शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कारण देत 'सायलेंट झोन'चा कायदेशीर आव आणून केवळ राजकारणापोटी हे बांधकाम रोखले गेले आहे. रुग्णांच्या आरोग्याची काळजी असणाऱ्यांनी यापूर्वी कधीही तक्रार केली नव्हती, मग आताच विरोध का? मागील बाजूस आवाज जाणार नाही, अशी ध्वनिरोधक व्यवस्था करून बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. 

 

वृद्ध, रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल


बसस्थानकाचे काम रडखडल्यामुळे सध्या चिमुकली मुले, शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध आणि प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसात झाडांखाली ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेक आजारी प्रवाशांना निवाऱ्याची अत्यंत गरज असताना प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.


सदर बांधकामावर  शासनाचा लाखो रुपयांचा निधी यात गुंतला असताना केवळ तक्रार अर्जांचे राजकारण करून काम थांबवणे अयोग्य आहे. त्यामुळे कायदा आणि माणुसकीची सांगड घालून डेपो मॅनेजरने हे काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा १८ ऑगस्टपासून आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा कॉ. गुरव यांनी निवेदनातून दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.