प्रथम दर्शनी तरी हे ठसे तरसाचे असल्याचे वनविभागाचे मत
संभ्रम दूर होण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावून लक्ष ठेवणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील मसोबा गल्ली परिसरात आज पहाटे सुमारे ६.०० वाजेच्या सुमारास एका हिंसक वन्य प्राण्याचा वावर दिसून आल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते हा प्राणी 'बिबट्या' असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाने पाहणी केली असता, प्रथमदर्शनी हे ठसे 'तरसा'चे असण्याची शक्यता वर्तवली आहे.
शंकर पाटील यांच्या घरालगत असलेल्या कुत्र्यावर या प्राण्याने हल्ला केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वनरक्षक दयानंद शिंदे, वनसेवक मारुती पाटील, किशोर नाईक, आरआरटी टीमचे अनिल दळवी, सौरभ कोडूस्कर, विनायक पताडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जमिनीवर उमटलेल्या या प्राण्याच्या पायांच्या ठशांचे बारीक निरीक्षण केले. वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सध्या तरी हे ठसे बिबट्याचे नसून तरसाचे असण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. या भागात तरस या वन्य प्राण्याचे वावर असल्याचे यापूर्वी देखील स्पष्ट झाले असल्याने व पायांच्या ठशांच्या केलेल्या निरीक्षणावरून हा प्राणी तरसच असण्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि हा प्राणी नेमका बिबट्या आहे की तरस, हे स्पष्ट करण्यासाठी वन विभागाने 'ट्रॅप कॅमेरे' लावून यावर नजर ठेवण्याचे नियोजन करत असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
सध्या वनविभागाचे पथक या वन्य प्राण्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. तोपर्यंत नरेवाडी आणि परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांनी पूर्ण खबरदारी बाळगावी आणि अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून व नरेवाडी ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.




