सर्पमित्र प्रा. अनिल मगर यांचे आवाहन
पोस्टर प्रदर्शन व प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन
गडहिंग्लज (संपत सावंत): नागपंचमीच्या दिवशी केवळ नागाची पूजा करून न थांबता निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर व संरक्षण करण्याची खरी गरज आहे. सर्प हे पर्यावरणाचा समतोल राखणारे महत्त्वाचे घटक असल्याने 'सापाला मारू नका, समजून घ्या!' असा मोलाचा संदेश सर्पमित्र प्रा. अनिल मगर यांनी दिला.
विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूलमध्ये नागपंचमीचे औचित्य साधून सर्पांविषयी शास्त्रीय माहिती देणाऱ्या भव्य पोस्टर प्रदर्शनाचे व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक उमेश सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर सर्पमित्र प्रा. अनिल मगर व सर्पमित्र समर्थ तराळ प्रमुख उपस्थित होते.
प्रदर्शनात नाग, घोणस, मण्यार, फुरसे या विषारी सापांसह धामण, अजगर, पानसाप, मांजरसाप व हरणटोळ अशा विविध सापांची माहिती व वैशिष्ट्ये मांडण्यात आली होती. प्रा. मगर यांनी विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख, त्यांचे निसर्गातील स्थान आणि सापांबद्दल असलेले गैरसमज दूर करत साप आढळल्यास घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता काय करावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवले.
सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय टाळावे?
काय करावे?
रुग्णाला शांत ठेवून धीर द्यावा.
दंश झालेला भाग स्थिर ठेवावा आणि रुग्णाला तत्काळ शासकीय किंवा सुसज्ज रुग्णालयात न्यावे.
काय करू नये?
दंश झालेल्या जागेवर काप देऊ नये किंवा विष उपसण्याचा प्रयत्न करू नये.
कोणत्याही मांत्रिक किंवा भोंदू उपायांवर वेळ वाया घालवू नये.
कार्यक्रमप्रसंगी उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी, सदानंद फुटाणे, प्रकाश गायकवाड, रवींद्र भंडारे, संदीप पाटील, दशरथ वरोटे, दत्ता लोहार, सौ. स्मिता शिंदे, सौ. रिजवाना मुल्ला, इराप्पा मरडी, सौ. कल्पना शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रवीण पाटील यांनी केले, प्रास्ताविक संपत सावंत यांनी मांडले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले, तर आभार सचिन मगदूम यांनी मानले.


