गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे पैगंबर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत, तेरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून हिंदू-मुस्लिम एकतेचे सुरेख दर्शन घडवण्यात आले.
रॅली व वितरण सोहळ्यानंतर झालेल्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले, सरपंच रमेश पुजारी, तंटामुक्त अध्यक्ष राजू इंगवले, मल्लाप्पा भंगारी, शिवाजी व्हनोळी, विठ्ठल जाधव, मौला देसाई, शब्बीर साबखान, इमाम हुसेन जकाती, दस्तगीर छडेदार, शब्बीर नगरकर, अल्लाबक्ष नेसरी, राजू गंधनवाले, बशीरअहमद करीमगोळ, भिमगोंडा देसाई, भूषण इंगवले, मलीक जकाती, मुन्ना जमादार यांच्यासह गावातील सर्वधर्मीय नागरिक, तरुण मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. करीमगोळ यांनी केले. धार्मिक सणांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत आणि सामाजिक ऐक्याचा दिलेला हा संदेश परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.



