Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मसाल्यांमध्ये घातक रसायनांची भेसळ: हैदराबादमध्ये मोठी कारवाई; २५ टन मसाले जप्त



हैदराबाद : हैदराबाद पोलीस आयुक्त टास्क फोर्सच्या 'H-FAST' (Hyderabad Food Adulteration Surveillance Team) आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) च्या अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत मसाले प्रक्रिया आणि विक्री केंद्रांवर मोठा छापा टाकला आहे. मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या रसायनांचा आणि रंगांचा वापर रोखणे, अन्न सुरक्षा मानकांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे या उद्देशाने ही विशेष धडक मोहीम राबवण्यात आली.


नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने एकूण १३ व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारे सुमारे २५ टन भेसळयुक्त मसाले जप्त करण्यात आले असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



 अतीविषारी रसायने आणि कापड रंगांचा वापर

तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (FSSAI) चे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले. मसाल्यांचा रंग चमकदार दाखवण्यासाठी आणि वजन वाढवून जास्त नफा कमावण्यासाठी आरोपी अत्यंत घातक, विषारी रसायनांचा वापर करत होते.


वापरण्यात आलेली घातक द्रव्ये: बुश सिंथेटिक ऑरेंज-रेड आणि ग्रीन फूड कलर, कापड रंग (Cloth Dyes), इंडस्ट्रियल-ग्रेड परमनंट कलर्स, शायनिंग पावडर (टॅल्कम पावडर) आणि राईस ब्रान ऑईल.


भेसळीची पद्धत: एका उत्पादकाकडे कनिष्ठ दर्जाची व नाकारलेली मोहरी चमकदार व वजनाने जास्त दाखवण्यासाठी त्यात कापडाचा रंग, टॅल्कम पावडर आणि तेल मिसळले जात होते. तर इतर युनिट्समध्ये लवंग, ओवा आणि शहाजीरे यांवर इंडस्ट्रियल रंगांचे कोटिंग करून ते प्रीमियम दर्जाचे म्हणून विकले जात होते.



जप्त केलेल्या साहित्यामध्ये ओवा, जिरे, लवंग, शहाजिरे, सोफ (बडीशेप), मोहरी, जिरे पावडर, मेथी दाणे, पांढरे तीळ, शायनिंग पावडर (टॅल्कम पावडर),  राईस ब्रान ऑईल, सिंथेटिक व फॅब्रिक डाई (रंग), रोलिंग मशीन्स यांचा समावेश आहे.


आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम


खाद्यपदार्थांमध्ये इंडस्ट्रियल रंग, फॅब्रिक डाई आणि टॅल्कम पावडरसारख्या अखाद्य पदार्थांच्या वापरामुळे मानवी शरीरावर अत्यंत घातक परिणाम होतात:

यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) निकामी होण्याचा धोका.

विषारी आणि कॅन्सर निर्माण करणाऱ्या (Carcinogenic) रसायनांमुळे कर्करोगाचा धोका.

पोटाचे गंभीर विकार आणि अल्सर होणे.

त्वचाविकार आणि अ‍ॅलर्जी.

मज्जासंस्था (Nervous System) आणि रोगप्रतिकारशक्तीवर दीर्घकालीन विपरीत परिणाम.



H-FAST ची १४० दिवसांतील धडक कामगिरी

स्थापनेपासून अवघ्या १४० दिवसांत H-FAST पथकाने युद्धपातळीवर काम करत शहरात ६५९ छापे टाकले, २०२ एफआयआर नोंदवले आणि सुमारे २४६ टन दूषित व भेसळयुक्त अन्न साठा जप्त केला.


अद्रक-लसूण पेस्ट: ३२ केंद्रांवर धाडी टाकून २७ टन पेस्ट जप्त करण्यात आली. यामध्ये पेस्ट पांढरी आणि घट्ट दिसण्यासाठी पेंटमध्ये वापरले जाणारे 'टायटॅनियम ऑक्साईड' आणि घातक 'अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड' मिसळले जात होते.

बनावट पनीर व दुग्धजन्य पदार्थ: दुधाचा एकही थेंब न वापरता युरिया, डिटर्जंट, पाम ऑईल आणि रसायनांपासून बनवलेले १.५ टन बनावट पनीर, २.५ टन दही आणि ३.२ टन क्रीम, तूप जप्त.

खराब मांस: हॉटेल्सना पुरवठा करण्यासाठी साठवलेले १२ टन खराब चिकन/मटण आणि ६० टन दुर्गंधीयुक्त कोंबड्यांचे टाकाऊ मांस जप्त.

इतर कारवाया: रसायनांनी फळे पिकवणारी १६ केंद्रे (२५.८ टन फळे जप्त), ९.२ टन भेसळयुक्त लोणचे, ३.८ टन नकली चहा पावडर आणि निकृष्ट दर्जाचे आर.ओ. वॉटर प्लांट्स (२३.७ टन) बंद करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.