९७ व्या जयंतीनिमित्त रंगली सुरांची सुरेल मैफल!
गडहिंग्लज ( प्रतिनिधी): आपल्या जादूई आवाजाने आणि अष्टपैलू गायकीने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू पार्श्वगायक स्वर्गीय किशोरकुमार यांच्या ९७ व्या जयंतीचे औचित्य साधून 'लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयल'च्या वतीने एका विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरेल गाणी आणि किशोरदांच्या आठवणींच्या उजाळ्याने हा कार्यक्रम चांगलाच रंगला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय किशोरकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. सुभाष चोथे व ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश कोळकी यांच्या शुभहस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले.
प्रतिमा पूजनानंतर आयोजित करण्यात आलेल्या गायन महोत्सवात स्थानिक कलाकारांनी किशोरदांची एकापेक्षा एक सरस आणि अवीट गोडीची गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये विरूपाक्ष पाटणे, निखिल पाटील, रफिक पटेल, महेश पाटणे, महादेव अष्टेकर आणि किरण खोराटे यांनी किशोरकुमार यांच्या विविध छटा दर्शवणार्या गाण्यांचे सादरीकरण केले. गाण्यांच्या माध्यमातून कलाकारांनी किशोरदांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना जुन्या सोनेरी आठवणींत नेले.
या प्रसंगी श्रीनिवास वेर्णेकर, बाबुराव रेडेकर, संजय मोहिते, श्री. कोकितकर, सुनील हंजी, बाळासाहेब पोतदार, रावसाहेब मुर्गी, महादेव तोदले, दयानंद खन्ना आणि श्री. कितूरकर यांच्यासह परिसरातील इतर अनेक मान्यवर व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट नियोजन विरूपाक्ष पाटणे आणि रफिक पटेल यांनी केले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.




