Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निलजीच्या तरुणाचा सिंधुदुर्गात धारदार सुरीने गळ्यावर-पोटावर सपासप वार करून घेत आत्महत्येचा थरारक प्रयत्न!

मालवण तालुक्यातील चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीत अंगावर काटा आणणारी घटना




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीत आज सकाळी दहाच्या सुमारास थरारक आणि धक्कादायक घटना घडली. गडहिंग्लज तालुक्यातील निलजी येथील मानदेश निगोडा पाटील या तरुणाने स्वतःच्याच गळ्यावर आणि पोटावर धारदार सुरीने सपासप वार करून आत्महत्येचा अत्यंत टोकाचा प्रयत्न केला. या रक्ताळलेल्या आणि गंभीर अवस्थेतील तरुणाला तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मानदेश पाटील हा निलजी येथून चौके येथे चिरे भरण्यासाठी आलेल्या एका वाहनावर क्लीनर म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीवर गेला असता, अचानक त्याने सोबत आणलेल्या धारदार सुरीने स्वतःच्या गळ्यावर वार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने पोटावर, हातावर आणि शरीराच्या इतर भागांवरही भीषण वार करून स्वतःला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला पाहून उपस्थितांची भंबेरी उडाली.


ग्रामस्थांनी घेतली तातडीने धाव ; आरोग्य केंद्रात प्रथमोपचार


घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिली मिठारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले. मात्र, गळ्यावरील आणि पोटावरील जखमा अत्यंत खोल व गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले


पोलीस ताफा दाखल; 'हा' ठरला प्रत्यक्ष पुरावा


घटना घडताच मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस कर्मचारी हेमंत धुरी, सुहास पांचाळ, सूरज रेडकर आणि साळेलचे पोलीस पाटील रवींद्र गावडे यांनी चौके आरोग्य केंद्रात धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीदरम्यान जखमी तरुणाने "मी स्वतःच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला" असा जबाब दिल्याने या घटनेमागील गूढ अधिक वाढले आहे. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध आता मालवण पोलीस घेत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर जखमी तरुणाला वेळेत रुग्णालयात पोहोचवली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.