Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज बसस्थानकासमोर कल्याण मटका जुगारावर एलसीबीची धाड; दोघांवर गुन्हा दाखल

४,७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त, अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने उगारला धडक कारवाईचा बडगा




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): शहर व परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गडहिंग्लज मध्यवर्ती बसस्थानकासमोरील उघड्यावर सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने अचानक छापा टाकला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ४,७०५ रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गडहिंग्लज एस. टी. स्टँडसमोरील एका एसटीडी बूथच्या शेजारी उघड्यावर कल्याण मटक्याचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि. १९) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.


या कारवाईत अबीदअली गुलाब जमादार (वय ५९, रा. हुजरे गल्ली, गडहिंग्लज) हा स्वतःच्या आणि मटका बुकी मालक हबीब मकानदार (रा. गडहिंग्लज) याच्या फायद्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका जुगाराच्या चिठ्ठ्या देताना रंगेहात सापडला.


पोलीस पथकाने संशयिताच्या ताब्यातून पांढऱ्या कागदावर कल्याण मटक्याचे अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या, एक निळ्या शाईचा बॉलपेन आणि ४,७०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४,७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजू ललिता कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अबीदअली जमादार व हबीब मकानदार या दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गडहिंग्लज पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूरचे पोलीस हवालदार सतीश कृष्णात जंगम आणि पोलीस अंमलदार राजू ललिता कोरे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे गडहिंग्लज शहरातील अवैध जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.