Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गवसे येथे कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात संपन्न



आजरा (हसन तकीलदार) : प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी अंतर्गत गवसे येथे कॅन्सरचे लवकर निदान, जनजागृती व आवश्यक मार्गदर्शनासाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.   

          

शिबिराचे उद्घाटन उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई तसेच गवसे सरपंच सौ. रेखा रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थितीत झाले.


यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. देशमाने व दंतचिकित्सक डॉ. जिरगे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, आजरा डॉ. सुधाकर जाधव, (वैद्यकीय अधिकारी, वाटंगी) डॉ. आर. जी. गुरव व डॉ. एम. ए. शेख यांची उपस्थिती होती.


शिबिरामध्ये एकूण ३६ रुग्णांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. तसेच मुख, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत आवश्यक तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच संशयित रुग्णांनी पुढील तपासणी व उपचारासाठी वेळेत संदर्भ सेवा घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.



प्रास्ताविक अतुल पाथरवट यांनी  तर आभार प्रदर्शन श्रीमती गीतांजली सुतार यांनी केले.


शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गवसे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीचे सर्व कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देत लवकर निदान व वेळेवर उपचारासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.