गडहिंग्लज (प्रतिनिधी): कॅमेऱ्याच्या एका क्लिकवर भूतकाळातील सोनेरी क्षण कायमस्वरूपी जपणारा ‘जागतिक छायाचित्र दिन’ (वर्ल्ड फोटोग्राफी डे) गडहिंग्लज तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी गुणे गल्ली येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कॅमेरा पूजन, विचारमंथन आणि सोशल मीडिया मोहिमेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी गुणे गल्ली येथील कार्यक्रमात मारुती चव्हाण यांच्या हस्ते कॅमेऱ्याला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले, तर छोटूसिंग साळुंखे यांनी श्रीफळ वाढवून उपक्रमाचा शुभारंभ केला.
कार्यक्रमादरम्यान आयोजित मनोगतात रमेश मगदूम, नितेश पोवार व बाळासाहेब पाटील यांनी फोटोग्राफीचे मानवी जीवनातील स्थान, तिची कला आणि बदलता इतिहास यावर प्रकाश टाकला. १८३७ मध्ये फ्रान्सचे लुई डॅगेर व जोसेफ नाइसफोरे नाइप्स यांनी ‘डॅगेरोटाइप’ ही छायाचित्रणाची पहिली यशस्वी पद्धत शोधली. पुढे १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रान्स सरकारने या तंत्रज्ञानाचे पेटंट खरेदी करून ते जगासाठी विनामूल्य खुले केले. याच ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून जगभरात १९ ऑगस्ट हा दिवस फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी नमूद केले.
अडचणींवर चर्चा व सोशल मीडिया मोहीम
यावेळी उपस्थित फोटोग्राफर्सनी संघटनेची पुढील ध्येयधोरणे, आधुनिक फोटोग्राफीतील आव्हाने आणि व्यवसायातील अडचणींवर सविस्तर चर्चा केली. छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व छायाचित्रकार आपले सर्वोत्तम फोटो सोशल मीडियावर शेअर करून हा दिवस डिजिटल माध्यमातूनही साजरा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमास मारूती चव्हाण, छोटुसिंग साळुंखे, नागेश कागे, रमेश मगदुम, सतीश पाटोळे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, नंदकुमार शेटके, इम्रान ढालाईत, शालवाना डिसोझा, सदानंद पाटील, चंद्रकांत नाईक, रविंद्र देसाई, हरिष देवार्डे, अनिल बनगे, महादेव मोरे, महेश खोत, बाळासाहेब पाटील, नितेश पोवार आणि वैभव देसाई आदी फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश पाटोळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार वैभव देसाई यांनी मानले.

