गणेश बाल विकास मंचतर्फे आयोजित कला स्पर्धांत पटकावली घवघवीत यश ; उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कला स्पर्धांमध्ये 'जागृती प्रशाले'च्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चमकदार कामगिरी करत विविध गटांत घवघवीत यश संपादन केले. श्री गणेश बाल विकास मंच ट्रस्ट, गडहिंग्लज यांच्या वतीने मराठी हस्ताक्षर, चित्रकला आणि फुलदाणी रंगभरणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
९ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेला बालकलाकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागृती प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कलाकौशल्याच्या जोरावर परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली.
व्यक्तिमत्त्व विकासासाठी कला-क्रीडा स्पर्धा आवश्यक: उत्तम वर्णे
विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना उत्तम वर्णे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून कला, क्रीडा आणि अवांतर उपक्रमांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरा आकार मिळतो. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढण्यास मोठी मदत होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
मराठी हस्ताक्षर स्पर्धा: प्रथम कु. विवेका पाटील, द्वितीय कु. तनिष्का चिकुर्डे, तृतीय कु. आर्या पाटील, उत्तेजनार्थ कु. गौरी अंकली, कु. चैताली कुंभार, कु. सही खवनेवाडकर
चित्रकला स्पर्धा: प्रथम कु. आर्या पाटील, द्वितीय कु. अन्वी मगदूम, तृतीय कु. वैष्णवी सरवडे, उत्तेजनार्थ कु. स्नेहल गोते, कु. ऋतुजा भारमल
फुलदाणी रंगभरण स्पर्धा : कु. वेदिका वायदंडे, कु. स्वरीन कुंभार, अंगद लाटकर, कु. अक्षरा पाटील.
प्राविण्य प्राप्त सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवर उत्तम वर्णे, अनिल मसाळे आणि संपत सावंत यांच्या शुभहस्ते आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक दत्ता लोहार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक उमेश सावंत आणि पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रम प्रसंगी अनिल मसाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश हरकारे यांनी केले. या सोहळ्याला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

