चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात दोन्ही खेळाडूंची निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): डेरवण येथे आयोजित २० वर्षांखालील ‘राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत’ गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मैदानावर वर्चस्व गाजवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाविद्यालयाची धावपटू सुकन्या सुधीर शिवणे हिने तब्बल तीन सुवर्णपदकांची कमाई केली, तर पृथ्वीराज शिवाजी पोवार याने एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकावला.
या राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर सुकन्या आणि पृथ्वीराज या दोन्ही खेळाडूंची चेन्नई (तमिळनाडू) येथे होणाऱ्या आगामी ‘राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धे’साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
स्पर्धेतील कामगिरीचा लेखाजोखा
सुकन्या सुधीर शिवणे: २० वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे, १५०० मीटर धावणे आणि ४ × ४०० मीटर रिले अशा तिन्ही प्रकारांत अव्वल स्थान मिळवत तीन सुवर्णपदकांना गवसणी घातली.
पृथ्वीराज शिवाजी पोवार: अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक, तर १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज
दोन्ही खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, शारीरिक क्षमता आणि उत्तम वेळेची नोंद याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत स्थान पक्के केले आहे. या यशाबद्दल शिवराज महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, उपाध्यक्ष के. जी. पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, संचालक प्रा. विश्वजीत कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व उपप्राचार्य प्रा. तानाजी चौगुले यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

