चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील घटनेने उडाली खळबळ
चंदगड : चुलत बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा मनात राग धरून एका महाविद्यालयीन तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे उघडकीस आली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून कट रचत तरुणाला रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह चारचाकी गाडीतून नेऊन स्वप्नवेल येथील खोल दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण चंदगड तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हर्षद हुंदळेकर असे हत्या झालेल्या दुर्दैवी महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद हुंदळेकर याचे संशयित कीर्तीकुमार कुद्रे याच्या चुलत बहिणीशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना कीर्तीकुमारचा तीव्र विरोध होता आणि त्यातूनच त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. हर्षदचा काटा काढण्यासाठी कीर्तीकुमारने सोशल मीडियाचा वापर करत 'इन्स्टाग्राम'वर 'कमल खरात' या नावाने एक बनावट (फेक) आयडी तयार केला. गेल्या आठवड्यापासून तो या बनावट आयडीवरून हर्षदशी चॅटिंग करत होता आणि त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.
शनिवारी रात्री संशयिताने 'कमल खरात' या नावाने हर्षदला पार्ले येथे भेटण्यासाठी बोलावून घेतले. हर्षद आपल्या एका मित्राला सोबत घेऊन पार्ले येथे पोहोचला. त्यावेळी 'पाटणे फाट्यावरून किट आणतो' असे त्याने मित्राला सांगितले. मात्र, पार्ले येथे पोहोचताच संशयिताने पुन्हा मेसेज करून 'तू एकटाच भेटायला ये' असे सांगितले. त्यामुळे हर्षदने मित्राला त्याच ठिकाणी थांबवले आणि तो एकटाच पुढे निघून गेला. हर्षद एकटाच पुढे येताच, पूर्वगामी कट रचून टपून बसलेल्या कीर्तीकुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच त्याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत हर्षदच्या डोक्यावर अत्यंत गंभीर व वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गाडीतून मृतदेह नेऊन स्वप्नवेल दरीत फेकला
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हर्षदचा मृतदेह एका चारचाकी गाडीत घातला आणि रात्रीच्या अंधारात स्वप्नवेलजवळील खोल दरीत फेकून दिला. घटना घडल्यानंतर हर्षद घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला, मात्र पोलिसांच्या तपासात या हत्येचा पर्दाफाश झाला.
दुर्गम दरीत ड्रोन आणि श्वानपथकाद्वारे शोधमोहीम सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून तपास सुरू केला. बुधवारी स्वप्नवेल दरीमध्ये मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. ड्रोन कॅमेरे, फॉरेन्सिक लॅब आणि श्वानपथका पाचारण करण्यात आले होते. मात्र, तिलारीनगर परिसरातील प्रचंड दाट धुके, पावसाचे वातावरण आणि अंधुक प्रकाश यामुळे बुधवारी मृतदेह शोधण्यात यश आले नाही. आज सावंतवाडी येथील प्रसिद्ध 'बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम'ला पाचारण करण्यात आले असून अत्यंत दुर्गम दरीत उतरून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील आणि पोलिस निरीक्षक निगाप्पा चौखंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. सध्या सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हत्येत सहभागी असलेल्या अन्य सहकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून तरुणाची अशाप्रकारे निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

