तारीख लवकरच जाहीर होणार; बैठकीत विकासकामांचाही निर्धार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव आणि उंबरवाडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री महाकाली व श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी सकाळी श्री महाकाली मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत मानाचा नारळ ठेवून यात्रेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात्रेची अधिकृत तारीख मुंबई ग्रामस्थ मंडळ आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून लवकरच निश्चित केली जाणार आहे.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक (अप्पी) पाटील, देवस्थान कमिटीच्या नूतन अध्यक्षा यशोधरादेवी देसाई-महागावकर आणि डॉ. शिवकुमार पाटील यांच्या हस्ते श्री महाकाली देवीच्या चरणी नारळ अर्पण करून पारंपरिक गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर 'पी-ढबाक'च्या गजरात व गुलालाची उधळण करत मानाच्या बकऱ्याची श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तेथे घटस्थापना करून महापूजा व आरती करण्यात आली.
यावेळी बोलताना अप्पी पाटील म्हणाले की, देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत आणि मुंबई ग्रामस्थ मंडळ यांच्यात समन्वय राखून यात्रा सुरळीत पार पाडली जाईल. तसेच यात्रा सुरू होण्यापूर्वी गावातील प्रत्येक वॉर्डातील आवश्यक त्या सोयी-सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील.
या बैठकीस देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर, सागरभाऊ देसाई, शारदादेवी पाटील, आय. एस. पाटील, रवींद्र धरणगुत्ती, विजय शिंगटे, रणवीर देसाई-महागावकर, आदित्य देसाई-महागावकर, सोमनाथ पाटील, आप्पासाहेब पोवार, भगवान कातकर, मनोहर पताडे, सदा सुरंगे, अक्षय थोरवत, महादेव नारळकर, तसेच उंबरवाडीचे मानकरी सुरेश पाटील, चंद्रशेखर पाटील, भूषण देसाई आणि आण्णासाहेब पाटील यांच्यासह दोन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


