Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी 'एल्गार'

प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा




गडहिंग्लज (प्रतिनिधी): धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मुख्य मागणीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील सकल धनगर बांधवांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणतीही संदिग्धता न ठेवता समाजाची बाजू ठामपणे मांडावी, तसेच निकाल प्रतिकूल आल्यास पर्यायी 'प्लॅन-बी' तयार ठेवावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.


आरक्षणाचा प्रश्न धनगर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय भवितव्याशी निगडित आहे. ८ सप्टेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने आपली स्पष्ट भूमिका मांडावी. केवळ आश्वासने न देता निश्चित कालमर्यादेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.


यावेळी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण कायदेशीर ताकदीने धनगर आरक्षणाची बाजू मांडण्यात यावी. कोर्टाचा निकाल प्रतिकूल लागल्यास आरक्षणासाठी राज्य शासनाने आत्तापासूनच ठोस 'प्लॅन-बी' तयार ठेवावा, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकला 'हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर' यांचे नाव देऊन अधिकृत अधिसूचना जारी करावी, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला 'राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' यांचे नाव देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करावी, श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटी (SIT) मार्फत सुरू असलेली चौकशी तात्काळ पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच देवस्थानचे विशेष व फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे,  श्री करवीर निवासिनी अंबामाता महालक्ष्मी देवस्थानसाठी पंढरपूर व शिर्डीच्या धर्तीवर स्वतंत्र, सक्षम व पारदर्शक देवस्थान कायदा करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.



या सर्व मागण्या समाजाच्या श्रद्धा, अस्मिता आणि जनभावनेशी जोडलेल्या असल्याने शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.



यावेळी संघटक सिद्धार्थ बन्ने, शिवाजी करीगार, विठ्ठल भमानगोळ, ऋतुराज रानगे,निंगाप्पा धनगर, शामराव धनगर, विठ्ठल दुंडगे, राघू धनगर, सिद्राम धनगर, अण्णासो कट्टीकर, सुभाष पुजेरी, अनिल पुजारी, तानाजी रानगे यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.