चंदगड: जिद्द, कठोर सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सुरुते (ता. चंदगड) येथील कु. त्रिनेत्रा भारत खनगावकर हिने राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत आपल्या दैदिप्यमान क्रीडाकौशल्याचा ठसा उमटवला आहे. जपान यमाबुकी शितो-र्यु कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित 'नॅशनल कराटे चॅम्पियनशिप - २०२६' मध्ये तिने 'काता' आणि 'कुमिते' या दोन्ही प्रकारांत अव्वल स्थान मिळवत दुहेरी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशभरातून आलेल्या नामांकित कराटेपटूंच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली होती. त्रिनेत्राने प्रत्येक फेरीत तंत्रशुद्ध खेळी, चपळता आणि एकाग्रतेचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. 'काता' आणि 'कुमिते' या दोन्ही प्रमुख प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) पटकाविले.
बेळगाव येथील 'कराटे स्पोर्ट्स अकॅडमी'चे मुख्य मार्गदर्शक चंदन जोशी, नागराज जोशी आणि मार्गदर्शिका करुणा पाटील यांचे तिला तांत्रिक बारकाव्यांसह मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, खेळाप्रती निष्ठा आणि मार्गदर्शकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन याच्या जोरावर तिने हे राष्ट्रीय यश संपादन केले.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सुवर्णपदक पटकावणाऱ्या त्रिनेत्राचे सुरुते गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यातून जोरदार अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, पुढील आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवासासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

