ठाकरे शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी यांचे निधन
नियतीचा क्रूर खेळ! वाढदिवसा दिवशीच हिरावून नेले
उद्या दुपारी कडगाव येथे होणार अंत्यसंस्कार
गडहिंग्लज (संतोष नाईक): ज्या दिवशी संपूर्ण गडहिंग्लज तालुका आपल्या लाडक्या नेत्याला आणि दानशूर व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आतुर झाला होता, दुर्दैवाने त्याच दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, सह संपर्कप्रमुख आणि 'शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'चे संस्थापक डॉ. रियाजभाई निजाम शमनजी यांचे कोल्हापूर येथील ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. आज ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या ५७ व्या वाढदिवशीच काळाने त्यांना हिरावून नेल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अत्यंत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोरगरिबांच्या हाकेला सदैव धावून जाणारा एक सच्चा कैवारी आणि शिक्षण क्षेत्रातील धुरंधर मार्गदर्शक हरपल्याची भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेश्मा, मुलगा अरमान, मुलगी सिमरन, भाऊ दिलावर, बहीण शहनाज आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बालपणाचा संघर्ष अन् ताशाच्या तालावर उभारलेले आयुष्य
डॉ. रियाजभाई शमनजी यांचा जन्म ९ सप्टेंबर १९६९ रोजी गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या आणि दारिद्र्याच्या सावटाखाली गेले. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी लहानपणी वडिलांसोबत गावात ताशा वाजवण्याचे काम केले. शिक्षणाची अलोट आवड असतानाही गरिबीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मनात जिद्द ठेऊन हार न मानता गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. तेथे मलिग्रे गावचे मित्र आणि शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते पांडुरंग अडसूळ यांच्या माध्यमातून त्यांना मुंबईत आसरा मिळाला. या काळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
८० टक्के समाजकारण अन् शिक्षण क्षेत्रातील त्यांची उत्तुंग भरारी
मुंबईत शिवसेनेचे कार्य करत असतानाच, आपल्या ग्रामीण भागातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी नेसरी सारख्या दुर्गम भागात 'ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळा'ची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एड. कॉलेज, नर्सिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय आणि फार्मसी कॉलेज यशस्वीपणे सुरू झाले, जिथे आज हजारो विद्यार्थी आपले भविष्य घडवत आहेत.
त्यांनी कै. रोशनबी शमनजी नर्सिंग स्कूल, रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय, यशवंत रेडेकर कॉलेज ऑफ फार्मसी, रियाजभाई शमनजी कॉलेज ऑफ फार्मसी'ची उभारणी केली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली होती.
शिवसेनेवरील निष्ठा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचा कलश कडगाव, महागाव, नेसरी व हरळी येथे सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी आणून रामतीर्थ येथे त्यांनी विसर्जित केला होता.
अंतिम दर्शन व दफनविधी कार्यक्रम
त्यांचे पार्थिव उद्या दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 ते 9.30 वाजेपर्यंत नेसरी येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून त्यानंतर सकाळी 10.30 ते 11.00 वाजेपर्यंत बहीरेवाडी येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये अंत्यदर्शन घेता येईल.
त्यानंतर मूळ गाव कडगाव ( ता.गडहिंग्लज) येथे दुपारी 2.00 वाजता दफनविधी होणार आहे. असे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आपला वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करणाऱ्या या दानशूर नेतृत्वाने वाढदिवसाच्याच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पक्षातील विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली -
शिवसेना पक्षातील अभ्यासू आणि निष्ठावंत स्तंभ हरपला: जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे
"डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक अत्यंत संयमी, अभ्यासू आणि निष्ठावंत नेतृत्व आपण गमावले आहे. सह संपर्कप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी संघटना तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जनसंपर्क आणि कार्यपद्धती आम्हा सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक राहिली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शमनजी परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो." अशी शोक भावना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी व्यक्त केली आहे.
सामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व गमावलो : तालुकाप्रमुख अजित खोत
डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या जाण्याने आपल्या तालुक्याने आणि शिवसेना पक्षाने एक सच्चा, मार्गदर्शक गमावला आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. संघटनावृद्धीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि शिवसैनिकांना दिलेली साथ आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. अशी शोक भावना शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजित खोत यांनी व्यक्त केली आहे.
मनमिळाऊ आणि एकनिष्ठ नेतृत्वाला मुकलो: उपतालुकाप्रमुख वसंत नाईक
डॉ. रियाजभाई शमनजी यांचे अचानक सोडून जाणे हा आमच्यासाठी वैयक्तिक आणि पक्षासाठी मोठा धक्का आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि पक्षाशी असलेली त्यांची एकनिष्ठता कायम स्मरणात राहील. एका सच्चा शिवसैनिकाला आणि मार्गदर्शकाला आपण मुकलो आहोत. अशी शोक भावना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी व्यक्त केली आहे.




