कोल्हापूर (प्रतिनिधी): सणासुदीच्या आणि प्रवासाच्या काळात खाजगी बस चालकांकडून होणाऱ्या लूटमारीला चाप लावण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) विशेष मोहीम उघडून कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या ६६ वाहनांवर तसेच जादा भाडे आकारणाऱ्या ८ बसेसवर आरटीओच्या वायुवेग पथकाने तात्काळ कारवाई केली आहे. प्रवाशांची मनमानी पिळवणूक करणाऱ्या अशा ट्रॅव्हल्स चालकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यासोबतच, जादा भाडे आकारल्यास प्रवाशांनी थेट व्हॉट्सअॅपवर पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षकांनी किणी टोल नाका येथे खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी १९० बसेस तपासण्यात आले. यामध्ये ५७ बसेस दोषी आढळले आहेत. दोन वाहनांनी जादा भाडे आकारल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व १९० वाहनांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करण्याबाबत आणि जादा भाडे न आकारण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या.
आरटीओच्या पथकाने १३ ते २० सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर शहरासह महामार्गांवर एकूण २३७ बसेसची सखोल तपासणी केली. यामध्ये ६६ वाहने विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळली, तर ८ वाहनांवर प्रवाशांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे वसूल केल्याप्रकरणी 'प्रतिवेदन' नोंदवून आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे.
अशी करा ऑनलाईन तक्रार!
शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाड्यापेक्षा एक रुपयाही जास्त न देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर कोणत्याही ट्रॅव्हल्स कंपनीने किंवा चालकाने जादा/मनमानी भाडे मागितले, तर प्रवाशांनी घाबरून न जाता खालील माध्यमांवर तातडीने तक्रार नोंदवावी:
तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक: 9423012134
ई-मेल आयडी: [email protected]
तक्रार करताना ही माहिती सोबत जोडा
१. बसचे मूळ तिकीट / बिल
२. वाहनाचा (बसचा) क्रमांक
३. प्रवासाचा संपूर्ण तपशील (कुठून कुठे)
४. प्रत्यक्षात आकारलेले/मागितलेले भाडे

